नाशिककरांच्या सेवेत ५० ई-बसेस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
नाशिककरांच्या सेवेत ५० ई-बसेस; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण
नाशिक :
नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम, आधुनिक, पर्यावरणपूरक आणि नागरिकाभिमुख करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. पीएम ई-बस सेवा योजनेंतर्गत दाखल झालेल्या ५० ई-बसेसचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.
या नव्या ई-बसेसमुळे नाशिक शहरातील नागरिकांना अधिक विश्वासार्ह, सुरक्षित आणि दर्जेदार सार्वजनिक प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सक्षम करण्याबरोबरच पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना देण्यासाठी या ई-बसेस महत्त्वपूर्ण ठरणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेच्या आधुनिकीकरणावर भर देताना, ई-बसेसच्या माध्यमातून नागरिकांना अधिक चांगली प्रवास सुविधा मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
ई-बसेसमुळे पारंपरिक इंधनावरील अवलंबित्व कमी करण्यास तसेच शहरातील प्रदूषण नियंत्रणास मदत होण्याची अपेक्षा आहे. आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभारण्याच्या दिशेने नाशिक शहरासाठी हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे.
या कार्यक्रमाला जलसंपदा मंत्री तथा नाशिकचे पालकमंत्री गिरीष महाजन, नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी आहेर-आडके, उपमहापौर विलास शिंदे, महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.