मुंबई, मुंबईचा १४ वर्षाखालील संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीच्या साखळी लढतीत वेंगसरकर संघाने शास्त्री संघाविरुद्ध कालच पहिल्या डावातील आघाडीचे गुण निश्चित केले होते, तर ओव्हल येथील दुसऱ्या लढतीत तेंडुलकर संघाच्या २५२ या धावसंख्येस प्रत्युत्तर देताना गावस्कर संघाच्या निखिल अहिरवाल याची शतकी खेळी आणि त्याला अर्विन अंबाती(५३) आणि लॅव्हिश सिंग (५९) यांच्या अर्धशतकी खेळींमुळे गावस्कर संघाने पहिल्या डावातील आघाडीचे गुण वसूल करीत ६ गुणांसह अव्वल स्थानावर झेप घेतली आहे.
ओव्हल मैदानावरील लढतीत चहापानापर्यंत गावस्कर संघाने केवळ २ बाद १३६ धावाच केल्यामुळे ही लढत अनिर्णित ठेवून उभय संघ एक एक गुण मिळविण्यावर समाधान मानणार असेच वाटत होते. मात्र शेवटच्या सत्रात अंबातीने वेगाने धावा काढण्याचा प्रयत्न केला पण अमर बीके याने एकाच षटकात अंबाती आणि कचराज यांना त्रिफळाचित करून धक्के दिले. मात्र लॅव्हिश सिंग मैदानात उतरला आणि त्याने पहिल्या चेंडूपासूनच आक्रमण करून ३७ चेंडूंतच ७ चौकार आणि एक षटकार ठोकत आपले इरादे स्पष्ट केले. २४४ धावा फलकावर असताना तो बाद झाला तेव्हा त्याने ५९ धावांची झंझावाती खेळी करून गावस्कर संघाचे पहिल्या डावातील आघाडीचे गुण निश्चित केले होते. दरम्यान अतिशय संथ फलंदाजी करणाऱ्या निखिल अहिरवाल याने २५४ चेंडूत आपले शतक पूर्ण केले. खेळ संपला तेव्हा निखिल ११६ धावांवर नाबाद राहिला. तेंडुलकर संघाचा मध्यमगती गोलंदाज अमर बीके याने ७७ धावांत ३ बळी मिळविले.
कर्नाटक सपोर्टींग वरील लढतीत शास्त्री संघाच्या ७४ धावांच्या आव्हानास उत्तर देताना वेंगसरकर संघाने सर्वबाद २०० धावांचे चोख उत्तर दिले. अर्शियन शेख (२९), समर्थ महाडिक (४०), अंकित म्हात्रे (२०) आणि कर्णधार अनुज चौधरी याने ७४ धावा केल्या. शास्त्री संघाच्या असद खान(४८/३) आणि आरुष जाधव (३१/३) यांनी प्रत्येकी तीन बळी मिळविले. खेळ संपला तेव्हा शास्त्री संघाने आपल्या दुसऱ्या डावात ८ बाद १५६ धावा केल्या होत्या. किआन प्रजापती याने २४, अक्षद जोशी याने ३७ तर कार्तिक छाजेर याने ५४ धावा केल्या. देवेन शर्मा याने ३८ धावांत ३ बळी तर दिव्यम लोढा याने २९ धावांत ४ बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक – कर्नाटक सपोर्टींग – क्रॉस मैदान – शास्त्री संघ ३४.४ षटकांत सर्वबाद ७४ आणि ५६.३ षटकांत ८ बाद १५६ ( किआन प्रजापती २४, अक्षद जोशी ३७, कार्तिक छाजेर ५४; देवेन शर्मा ३८ धावांत ३ बळी, दिव्यम लोढा २९ धावांत ४ बळी) वि. वेंगसरकर संघ – ५९.५ षटकांत सर्वबाद २०० (अर्शियन शेख २९, समर्थ महाडिक ४०, अंकित म्हात्रे २०, अनुज चौधरी ७४; असद खान ४८ धावांत ३ बळी, आरुष जाधव ३१ धावांत ३ बळी ).
ओव्हल मैदान – तेंडुलकर संघ ८३.३ षटकांत सर्वबाद २५२ वि. गावस्कर संघ – ९० षटकांत ५ बाद २६६ (निखिल अहिरवाल नाबाद ११६, अर्विन अंबाती ५३, लॅव्हिश सिंग ५९; अमर बीके ७७ धावांत ३ बळी. )