निवतीतील जलसफरीवर IRS नोंदणीची सक्ती; स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा सवाल
निवतीतील जलसफरीवर IRS नोंदणीची सक्ती; स्थानिक पर्यटन व्यावसायिकांचा सवाल
सिंधुदुर्गच्या किनाऱ्यावर पर्यटनाची पालं फुलू लागली असताना, स्थानिक भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या मुळावरच प्रशासकीय नियमांचा घाव बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वर्षानुवर्षे स्वतःच्या मेहनतीने आणि लाखो रुपयांची गुंतवणूक करून सागरी पर्यटन उभे करणाऱ्या स्थानिक बोट व्यावसायिकांवर निवती लाईट हाऊस जलसफरीसाठी IRS नोंदणीची सक्ती करण्यात आल्याने संतापाची लाट उसळली आहे. सुरक्षिततेच्या नियमांना विरोध नाही; मात्र स्थानिकांनी उभ्या केलेल्या पर्यटन व्यवसायासाठी पुन्हा लाखो रुपयांचा आर्थिक बोजा का? आणि कोकण समृद्ध करणाऱ्या या भूमिपुत्रांच्या रोजगाराचा विचार कोण करणार? असा थेट सवाल आता पर्यटन व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
वेंगुर्ला (प्रतिनिधी) : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन हंगामाला सुरुवात होत असतानाच निवती लाईट हाऊस व ‘म्हातारीची चूळ’ परिसरातील जलसफरीच्या बोटींवर महाराष्ट्र सागरी मंडळाकडून (MMB) इंडियन रजिस्टर ऑफ शिपिंग (IRS) नोंदणीची अट घालण्यात आल्याने स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयामुळे स्थानिक भूमिपुत्रांच्या पर्यटन व्यवसायावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्याने निवती लाईट हाऊस परिसराचा ‘Inland Vessels Act 2021’ अंतर्गत ‘झोन-२’मध्ये समावेश करावा, अशी मागणी पर्यटन व्यावसायिक महासंघाचे अध्यक्ष विष्णू मोंडकर यांनी केली आहे
वेंगुर्ला-निवती परिसरातून निवती लाईट हाऊसपर्यंतची सागरी सफर पर्यटकांसाठी प्रमुख आकर्षण ठरली आहे. मात्र, बंदर निरीक्षकांच्या परिपत्रकानुसार निवती लाईट हाऊस किनाऱ्यापासून सुमारे ५.२९ नॉटिकल मैल म्हणजेच जवळपास ९.८ किलोमीटर अंतरावर असल्याने Inland Vessels Act अंतर्गत नोंदणीकृत बोटींना निश्चित इनलँड व्हेसल मर्यादेबाहेर जाण्यावर निर्बंध असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे या जलसफरीसाठी Merchant Shipping Act अंतर्गत IRS नोंदणी आवश्यक करण्यात आली आहे.
मात्र, स्थानिक पर्यटन व्यावसायिक महासंघाने या भूमिकेला आक्षेप घेतला आहे. तांत्रिक अडचणींचा सरळ मार्ग म्हणून IRS नोंदणीची सक्ती करण्याऐवजी कोकणातील स्थानिक भौगोलिक परिस्थिती, समुद्राचे स्वरूप आणि वर्षानुवर्षे या व्यवसायावर अवलंबून असलेल्या स्थानिक भूमिपुत्रांचा रोजगार यांचा विचार करावा, अशी भूमिका महासंघाने घेतली आहे.
केंद्राच्या Inland Vessels Act 2021 अंतर्गत समुद्रातील लाटांची तीव्रता, भौगोलिक परिस्थिती आणि जलक्षेत्राचे स्वरूप लक्षात घेऊन विविध झोन निश्चित करण्याची तरतूद असल्याचा दावा महासंघाने केला आहे. त्यानुसार निवती लाईट हाऊस परिसराचा ‘झोन-२’मध्ये समावेश केल्यास स्थानिक पर्यटन बोटींना आवश्यक सुरक्षा निकषांसह कायदेशीररित्या जलसफर करता येऊ शकते, असे महासंघाचे म्हणणे आहे.
स्थानिकांच्या रोजगाराचा विचार कोण करणार?
दरम्यान, या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक पर्यटन व्यावसायिकांमधून एक महत्त्वाचा सवाल उपस्थित होत आहे. कोकणात पर्यटन वाढावे, स्थानिकांना रोजगार मिळावा आणि भूमिपुत्रांच्या माध्यमातून पर्यटन व्यवसाय समृद्ध व्हावा, यासाठी वर्षानुवर्षे स्थानिकांनी मेहनत घेतली आहे. या जलसफरीचा व्यवसायही येथील स्थानिक नागरिकांच्या कष्टातून आणि त्यांच्या गुंतवणुकीतून उभा राहिला आहे.
अशा परिस्थितीत लाखो रुपयांचा अतिरिक्त आर्थिक बोजा टाकणारी IRS नोंदणीची अट स्थानिक व्यावसायिकांना कितपत परवडणार? स्थानिकांनी उभा केलेला पर्यटन व्यवसाय सुरक्षितता आणि नियमांच्या चौकटीत चालविण्यासाठी व्यवहार्य मार्ग काढण्याऐवजी मोठ्या खर्चाच्या नोंदणीची सक्ती करणे योग्य आहे का? असा प्रश्न पर्यटन व्यावसायिकांकडून उपस्थित केला जात आहे.
सुरक्षिततेच्या नियमांना स्थानिक व्यावसायिकांचा विरोध नसून, सुरक्षिततेचे निकष कायम ठेवत स्थानिकांच्या रोजगारावर गदा येणार नाही आणि कोकणातील पर्यटन व्यवसायही अबाधित राहील, असा मध्यममार्ग शासनाने काढावा, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
कोकणातील पर्यटनाला चालना देताना येथील भूमिपुत्र, त्यांचा रोजगार, त्यांची वर्षानुवर्षांची मेहनत आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांचाही विचार शासनाने करावा, अशी मागणी जोर धरत आहे.