पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी शरद पवार यांनी घेतली भेट
NEET पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर चर्चा
नवी दिल्ली l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन NEET परीक्षेतील पेपरफुटी, विद्यार्थ्यांचे आंदोलन, शेती आणि शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर सविस्तर चर्चा केली.
शरद पवार यांनी सांगितले की, NEET परीक्षेतील पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांनी केलेले आंदोलन, आंदोलनादरम्यान पोलिसांकडून विद्यार्थ्यांना देण्यात आलेली अयोग्य वागणूक तसेच विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे या विषयांकडे त्यांनी पंतप्रधानांचे लक्ष वेधले.
याशिवाय, महाराष्ट्रासह देशातील शेती क्षेत्रातील प्रशासकीय व धोरणात्मक त्रुटी, शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या, पाणी व्यवस्थापन आणि शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध महत्त्वाच्या विषयांवर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीदरम्यान विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर आणि पेपरफुटी प्रकरणावर प्रभावी उपाययोजना करण्याबाबत आपली भूमिका मांडल्याचे शरद पवार यांनी सांगितले. या सर्व विषयांवर सकारात्मक आणि ठोस उपाययोजना करण्याचे आश्वासन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्याचा दावा त्यांनी केला.
या भेटीदरम्यान खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या.