पं. नीळकंठ अभ्यंकर जन्मशताब्दीनिमित्त ‘गुणसागर निर्गुणी’ विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
पं. नीळकंठ अभ्यंकर जन्मशताब्दीनिमित्त ‘गुणसागर निर्गुणी’ विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई –
सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने ज्येष्ठ संगीतकार गुरुवर्य पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त “गुणसागर निर्गुणी – अमूल्य संगीत रचनांचा जागर” या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पं. नीळकंठ अभ्यंकर यांच्या संगीत क्षेत्रातील अमूल्य योगदानाला अभिवादन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात त्यांच्या निवडक आणि अजरामर संगीत रचनांचा सुरेल आविष्कार रसिकांना अनुभवता येणार आहे.
या विशेष कार्यक्रमात ३२ गुणवंत गायक-गायिका तसेच लोकप्रिय कलावंतांचा सहभाग असून, त्यांच्या सादरीकरणातून अभ्यंकर यांच्या संगीत वारशाचा जागर केला जाणार आहे. विविध संगीत प्रकारांचा संगम असलेला हा अभिनव सांगीतिक आविष्कार संगीतप्रेमींसाठी पर्वणी ठरणार आहे.
हा कार्यक्रम बुधवार, १७ जून २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. संगीत रसिकांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून या सांगीतिक मेजवानीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.