परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धा
अनुज चौधरी, अक्षद जोशीची शतकी खेळी; आरव यादवचे ६ बळी
मुंबई, १४ मे : मुंबईचा १४ वर्षाखालील मुलांचा संघ निवडण्यासाठी खेळविण्यात येणाऱ्या एच.डी.एफ.सी. बँक परिवर्तन चषक निवड चाचणी क्रिकेट स्पर्धेच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर अनुज चौधरी (१०९), अक्षदा जोशी (१००) यांची शतके आणि आरव यादवने मिळविलेले ६ बळी यांनी आपली मोहर उमटवली.

ओव्हल मैदान येथील वेंगसरकर क्रिकेट अकादमीच्या मैदानावर सुरु झालेल्या लढतीत सुनील गावस्कर संघाने नाणेफेक जिंकून दिलीप वेंगसरकर संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि अनुज चौधरींच्या शतकी खेळीनंतरही त्यांचा डाव १९१ धावांवर रोखण्यात यश मिळविले. अनुजने १२१ चेंडूत २० चौकारांसह १०९ धावा केल्या तर अथर्व पाचकुडे याने २४ धावा केल्या. गावस्कर संघाचा डावखुरा फिरकी गोलंदाज नीरज पनवर याने ५४ धावांत ४ बळी मिळविले तर मध्यमगती गोलंदाज रितेश नंदेश्वर (४०/२) आणि श्रेयांस सिंग (२७/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळविले. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा गावस्कर संघाने ३५ षटकांच्या खेळात ३ बाद ९५ धावा केल्या होत्या.
कर्नाटक सपोर्टींग (क्रॉस मैदान) येथील लढतीत सचिन तेंडुलकर संघाने रवी शास्त्री संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले आणि त्यांनी सलामीवीर अक्षद जोशींच्या (९९ चेंडूत २० चौकारांसह १०० धावा) शतकी खेळीमुळे ५६.४ षटकांत सर्वबाद २५१ धावा केल्या. अक्षदने समर्थ महाडिक (२९) यांच्यासह दुसऱ्या विकेटसाठी ९० धावांची भागी रचली तर डावखुरा कार्तिक छाजेर (नाबाद ५८) आणि रणवीर सिंग (३५) या जोडीने सहाव्या विकेटसाठी ६८ धावांची भागी रचल्याने त्यांना अडीचशे धावांचा टप्पा ओलांडता आला. त्यांचे शेवटचे पाच फलंदाज भोपळाही फोडू शकले नाहीत. आरव यादवने ५१ धावांत ६ बळी मिळविण्याची करामत करताना शेवटच्या ५ फलंदाजांना शून्यावर तंबूत पाठवले. पहिल्या दिवसाअखेर तेंडुलकर संघाने २२ षटकांत २ बाद ९२ असे चोख प्रत्युत्तर दिले आहे. सलामीवीर नियांश मारू ४८ धावांवर खेळात असून आरव यादव ३४ धावा करून त्याला साथ देत आहे.
संक्षिप्त धावफलक – (ओव्हल मैदान ) वेंगसरकर संघ – ४९.३ षटकांत सर्वबाद १९१ (अथर्व पाचकुडे २४, अनुज चौधरी १०९; रितेश नंदेश्वर ४० धावांत २ बळी, नीरज पनवर ५४ धावांत ४ बळी. श्रेयांस सिंग २७ धावांत २ बळी) वि. गावस्कर संघ – ३५ षटकांत ३ बाद ९५ (निखिल अहिरवाल २७, अद्वैत कचराज खेळत आहे २१, लविष सिंग खेळत आहे 28)
(कर्नाटक सपोर्टींग-क्रॉस मैदान) – शास्त्री संघ – ५६.४ षटकांत सर्वबाद २५१ (अक्षदा जोशी १००, समर्थ महाडिक २९, अर्णव शेलार २६, कार्तिक छाजेर नाबाद ५८, रणवीर सिंग ३५; आरव यादव ५१ धावांत ६ बळी) वि. तेंडुलकर संघ – २२ षटकांत २ बाद ९२ (नीयांश मारू खेळत आहे ४७, आरव यादव खेळात आहे ३४; नक्ष दर्जी २५ धावांत २ बळी)


