पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला योजनांची जोड देऊन व्यवसायवृद्धीला चालना द्यावी -पालकमंत्री नितेश राणे

0
17
पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला योजनांची जोड देऊन व्यवसायवृद्धीला चालना द्यावी -पालकमंत्री नितेश राणे
पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला योजनांची जोड देऊन व्यवसायवृद्धीला चालना द्यावी -पालकमंत्री नितेश राणे

पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला योजनांची जोड देऊन व्यवसायवृद्धीला चालना द्यावी –पालकमंत्री नितेश राणे

प्रधानमंत्री विश्वकर्मा लाभार्थी मेळाव्यात आवाहन

सिंधुदुर्ग :
पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला शासनाच्या विविध योजनांची जोड देऊन त्यांच्या व्यवसायवृद्धीला चालना द्यावी. प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना ही समाजातील १२ बलुतेदार तसेच १८ पारंपरिक व्यवसायांमध्ये कार्यरत कारागिरांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची क्षमता असलेली महत्त्वाची योजना आहे. त्यामुळे ही योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘सेवा संकल्प अभियान’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना लाभार्थी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पालकमंत्री नितेश राणे दूरदृश्यप्रणालीद्वारे बोलत होते. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी वीरसिंग वसावे, समिती सदस्य प्रभाकर सावंत, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले, जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी टी. डी. गावडे यांच्यासह अधिकारी आणि लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पारंपरिक कारागिरांच्या कौशल्याला प्रशिक्षण, आधुनिक अवजारे आणि अर्थसहाय्याची जोड देऊन त्यांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना महत्त्वपूर्ण ठरत आहे. जिल्ह्यातील पात्र कारागिरांनी योजनेची माहिती घेऊन त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही पालकमंत्री राणे यांनी केले.
कौशल्याला आधुनिक साधनांची जोड
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे म्हणाल्या की, जिल्ह्यात पिढ्यान्‌पिढ्या पारंपरिक व्यवसाय करणाऱ्या कारागिरांचे कौशल्य ही जिल्ह्याची मोठी संपत्ती आहे. या कौशल्याला शासनाच्या योजना, आधुनिक साधने, कौशल्य प्रशिक्षण आणि अर्थसहाय्याची जोड मिळाल्यास कारागिरांना व्यवसायाचा विस्तार करण्याची नवी संधी मिळू शकते.
प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेत सुतार, सोनार, लोहार, चर्मकार, गवंडी, मूर्तिकार, परीट, शिंपी, कुंभार, हार-तुरे तयार करणारे, नाभिक, विणकर, चटई व झाडू बनविणारे, दोऱ्या तयार करणारे, होडी बांधणारे, मासेमारीची जाळी बनविणारे, कुलूप तयार करणारे तसेच पारंपरिक खेळणी बनविणारे अशा १८ पारंपरिक व्यवसायांतील कारागिरांचा समावेश आहे.
प्रशिक्षणासह टूलकिट आणि कर्जाची सुविधा
योजनेअंतर्गत निवड झालेल्या लाभार्थ्यांना मूलभूत कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाते. प्रशिक्षण कालावधीत दररोज ५०० रुपये विद्यावेतन देण्यात येते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर व्यवसायासाठी आवश्यक अवजारे व साधने खरेदी करण्यासाठी १५ हजार रुपयांचे टूलकिट वस्तुरूपात देण्यात येते. तसेच लाभार्थ्यांना ओळखपत्र व प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर प्रमाणपत्र दिले जाते.
प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर व्यवसायासाठी पहिल्या टप्प्यात १ लाख रुपयांपर्यंतचे तारणमुक्त कर्ज उपलब्ध होते. पहिल्या टप्प्यातील कर्जाची वेळेत परतफेड केल्यास व्यवसाय विस्तारासाठी दुसऱ्या टप्प्यात २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. या कर्जावर ५ टक्के व्याजदर लागू असून उर्वरित व्याजाची जबाबदारी शासनाकडून घेतली जाते.
सिंधुदुर्गात ५,६७४ अर्ज प्राप्त
सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेअंतर्गत आजअखेर ५,६७४ अर्ज प्राप्त झाले असून, त्यापैकी १,४७६ लाभार्थ्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र कारागिरांनी जवळच्या सीएससी (CSC) केंद्राशी संपर्क साधावा. तसेच pmvishwakarma.gov.in या अधिकृत पोर्टलवर नोंदणी करता येते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक श्रीपाद दामले यांनी केले, तर आभार जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी टी. डी. गावडे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here