मतदार नोंदणीसाठी शेवटचे १५ दिवस; ३० सप्टेंबरपर्यंत दावे-हरकती दाखल करा
पात्र नागरिकांची १०० टक्के नोंदणी करण्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांचे आवाहन
रत्नागिरी :
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रारूप मतदार यादीतील दावे व हरकती दाखल करण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदत देण्यात आली आहे. या प्रक्रियेसाठी आता शेवटचे १५ दिवस शिल्लक असून, जिल्ह्यातील एकही पात्र नागरिक मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी विशेष नोंदणी मोहीम युद्धपातळीवर राबवावी, असे निर्देश रत्नागिरीचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल गायकवाड यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.
ऑक्टोबर २०२४ नंतर मतदार यादीचे पुनरीक्षण झालेले नसल्यामुळे स्थलांतरित नागरिक तसेच १ ऑक्टोबर २०२६ रोजी किंवा त्यापूर्वी १८ वर्षे पूर्ण करणारे नवमतदार या मोहिमेत मतदार नोंदणीस पात्र आहेत. संबंधित पात्र नागरिकांनी ‘प्रपत्र-६’ व घोषणापत्र भरून मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
शाळा-महाविद्यालयांत विशेष शिबिरे
सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठांमधील ‘निवडणूक साक्षरता मंच’ (ELC) यांच्या माध्यमातून नवमतदारांचे ऑनलाइन व ऑफलाइन अर्ज भरून घेण्यासाठी विशेष शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उद्योग समूह, कंपन्या आणि गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये ‘मतदार जागृती मंच’च्या माध्यमातून जनजागृती सत्रे व मतदार नोंदणी शिबिरे घेण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवरून रील्स, माहितीपर पोस्ट, शॉर्ट व्हिडिओ आणि इन्फ्लुएन्सर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यावर भर देण्यात आला आहे.
वंचित घटकांसाठी विशेष नोंदणी
तृतीयपंथी, दिव्यांग व्यक्ती, देह व्यवसाय करणाऱ्या महिला, आदिवासी समूह (PVTGs) तसेच भटके-विमुक्त घटकांसाठी संबंधित विभाग व सामाजिक संस्थांच्या सहकार्याने क्षेत्रनिहाय केंद्रे सुरू करून प्रत्यक्ष मतदार नोंदणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
एसटी बसस्थानके, बसेस, रेल्वे स्थानके, शासकीय व निमशासकीय कार्यालये, बँका, पोस्ट कार्यालये, नगरपालिका आणि चित्रपटगृहांमध्ये पोस्टर्स व डिजिटल डिस्प्लेद्वारे मतदार नोंदणीची प्रसिद्धी करण्याचेही नियोजन करण्यात आले आहे.
केवळ जनजागृती न करता प्रत्येक पात्र नागरिकाची प्रत्यक्ष नोंदणी पूर्ण करणे हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. सर्व मतदार नोंदणी अधिकारी व सहायक मतदार नोंदणी अधिकाऱ्यांनी साप्ताहिक उद्दिष्ट निश्चित करून मोहिमेच्या प्रगतीचा आढावा घ्यावा, असे निर्देश राहुल गायकवाड यांनी दिले आहेत.