पालक सचिव विरेंद्र सिंह यांची वेंगुर्ला तालुक्यात पाहणी
पालक सचिव विरेंद्र सिंह यांची वेंगुर्ला तालुक्यात पाहणी; लोकसहभागातील जलसंधारण कामांचे कौतुक
वेंगुर्ला :
शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी, नागरिकांना वेळेत सेवा वितरण आणि लोकसहभागातून होणाऱ्या विकासकामांना प्राधान्य द्यावे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करून नागरिकांना जलद व सुलभ सेवा उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालक सचिव तथा इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे सचिव विरेंद्र सिंह यांनी वेंगुर्ला तालुक्याच्या दौऱ्यादरम्यान दिल्या.
या दौऱ्यात त्यांनी तुळस प्राथमिक आरोग्य केंद्र, मातोंड ग्रामपंचायत, सावंतवाडा येथील बंधारा, वेंगुर्ला नगरपरिषदेचे नमो उद्यान आणि नगरपरिषद कार्यालयाला भेट देऊन विविध कामांची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अपूर्वा बासूर, जिल्हा परिषद सदस्य सुजाता पडवळ, उपविभागीय अधिकारी विरसिंग वसावे, तहसीलदार ओंकार ओतारी यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
आरोग्य सुविधांचा आढावा
पालक सचिवांनी तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रातील बाह्यरुग्ण विभाग, शीतसाखळी कक्ष, औषध भांडार, प्रसूतीगृह आणि असंसर्गजन्य रोग नियंत्रण कक्षाची पाहणी केली. विविध नोंदवह्यांची तपासणी करून आरोग्य केंद्रामार्फत नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवा आणि उपलब्ध सुविधांची माहिती घेतली. यावेळी लाभार्थ्यांना वयोवंदना कार्ड आणि आभा कार्डचे वितरण करण्यात आले.
मातोंडमध्ये लोकसहभागातून जलसंधारण
मातोंड ग्रामपंचायतीला भेट दिल्यानंतर सरपंच मयूरी वडाचेपाटकर यांनी पालक सचिवांचे स्वागत केले. ग्रामसेवक प्रल्हाद इंगळे यांनी ग्रामपंचायतीच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. उपसरपंच वैभवी परब यावेळी उपस्थित होत्या.
मातोंड गावात बचत गट, शाळा आणि ग्रामस्थांच्या पुढाकारातून मोठ्या प्रमाणात वनराई बंधारे व अन्य जलसंधारणाची कामे करण्यात आली आहेत. लोकसहभागातून उभी राहिलेली ही चळवळ गावाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत असल्याचे नमूद करत पालक सचिवांनी या कामांचे कौतुक केले. यावेळी ग्रामस्थांनी “तुम्ही आलात आणि पाऊस पडला,” असे म्हणत आनंद व्यक्त केला. पालक सचिवांच्या हस्ते ग्रामस्थांना विविध दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच ग्रामपंचायतीतील सीएससी केंद्राला भेट देऊन ऑनलाइन सेवांची माहिती घेण्यात आली.
यानंतर सावंतवाडा येथील बंधाऱ्याची पाहणी करून पाणी अडविणे, जिरविणे आणि स्थानिक जलस्रोतांची क्षमता वाढविण्यासाठी सुरू असलेल्या कामांचा आढावा घेण्यात आला.
नमो उद्यानाच्या कामाचे कौतुक
वेंगुर्ला नगरपरिषदेअंतर्गत उभारण्यात आलेल्या नमो उद्यानाची पाहणी करताना पालक सचिवांनी तेथील सुविधा आणि विकासकामांची माहिती घेतली. उद्यानाची उभारणी आदर्शवत पद्धतीने करण्यात आल्याचे सांगत त्यांनी कामाचे कौतुक केले.
त्यानंतर नगरपरिषद कार्यालयात स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. नगराध्यक्ष दिलीप गिरप यांनी पालक सचिवांचे स्वागत केले. नगराध्यक्ष दिलीप गिरप, नगरपरिषद सदस्य प्रशांत आपटे आणि मुख्याधिकारी हेमंत किरुळकर यांनी नगरपरिषदेच्या कामकाजाची माहिती दिली.
सुमारे १५० वर्षांची परंपरा असलेल्या वेंगुर्ला नगरपालिकेने प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान करून नागरिकांना विविध नागरी सेवा जलद व सुलभतेने उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचना पालक सचिवांनी दिल्या. विकासकामांसोबतच सेवा वितरणाची गुणवत्ता वाढविणे, नागरिकांच्या गरजांना प्राधान्य देणे आणि लोकसहभागातून शाश्वत उपक्रम राबविणे आवश्यक असल्याचे या दौऱ्यातून अधोरेखित झाले.