‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ : पहिल्या टप्प्यात हजारो शेतकऱ्यांना दिलासा
‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ : पहिल्या टप्प्यात हजारो शेतकऱ्यांना दिलासा
महाराष्ट्र शासनाच्या ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६’ अंतर्गत पहिल्या टप्प्यात राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळाला असून कृषी क्षेत्राला नवसंजीवनी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शासनाने जाहीर केलेल्या विभागनिहाय आकडेवारीनुसार अमरावती विभागातील १ लाख ५८ हजार १४६ शेतकऱ्यांच्या खात्यात १,३७२.१७ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत. नाशिक विभागातील १ लाख ४० हजार ५८ शेतकऱ्यांना १,२०९.३९ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे.
छत्रपती संभाजीनगर विभागातील १ लाख ३० हजार २३४ शेतकऱ्यांच्या खात्यात ९३२.६१ कोटी रुपये जमा झाले असून पुणे विभागातील १ लाख ४ हजार ६१ शेतकऱ्यांना ८६०.१७ कोटी रुपयांचा लाभ मिळाला आहे. नागपूर विभागातील ७० हजार २१० शेतकऱ्यांना ५४४.७१ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तर कोकण विभागातील १८ हजार ६८७ शेतकऱ्यांच्या खात्यात १०८.८६ कोटी रुपये जमा करण्यात आले आहेत.
राज्य शासनाच्या या महत्त्वपूर्ण योजनेमुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा बोजा कमी होण्यास मदत होणार असून कृषी उत्पादन वाढीस चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.