पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि युवकांवरील दडपशाहीविरोधात वाशीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आंदोलन
पेपरफुटी, भ्रष्टाचार आणि युवकांवरील दडपशाहीविरोधात वाशीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आंदोलन
नवी मुंबई प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाच्या वतीने नवी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज चौक, वाशी येथे केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी भ्रष्टाचार, परीक्षांमधील कथित घोटाळे, पेपरफुटी आणि आंदोलकांवरील दडपशाहीच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात देशातील शिक्षण व्यवस्थेतील कथित गैरव्यवहार, युवकांचे प्रश्न आणि बेरोजगारी याकडे सरकारचे लक्ष वेधण्यात आले.
यावेळी शशिकांत शिंदे यांनी सांगितले की, विद्यार्थी-युवकांच्या न्याय्य हक्कांसाठी लोकशाही मार्गाने आंदोलन करणारे सोनम वांगचूक यांच्यावर झालेली कारवाई, दिल्लीतील जंतर-मंतर येथे युवकांवर झालेला लाठीमार तसेच परीक्षांमधील पेपरफुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले आहे. या प्रकरणांची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी पक्षाची मागणी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पेपरफुटी रोखण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, आंदोलकांवरील दडपशाही तात्काळ थांबवावी आणि युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, या प्रमुख मागण्यांसाठी पक्षाचा लढा सुरूच राहील, असेही त्यांनी सांगितले.
या आंदोलनात नवी मुंबई जिल्हाध्यक्ष मंगेश आमले, पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.