प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण

0
9
प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण
प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण

प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय नोकऱ्यांत ५ टक्के आरक्षण

सुधारित धोरण निश्चित

मुंबई :
महाराष्ट्र राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय, निमशासकीय तसेच इतर क्षेत्रांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी ५ टक्के खेळाडू आरक्षणाचे सुधारित धोरण निश्चित करण्यात आले आहे. या धोरणानुसार गट ‘अ’, ‘ब’, ‘क’ आणि ‘ड’ मधील सरळ सेवा पदांसाठी ५ टक्के समांतर खेळाडू आरक्षण लागू राहणार आहे.
ऑलिम्पिक गेम्स २००५ नंतरच्या ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये समाविष्ट असलेल्या खेळांसह स्थानिक व देशी खेळांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने या धोरणात विविध खेळांचा समावेश करण्यात आला आहे. कबड्डी, खो-खो, बुद्धिबळ, मल्लखांब आणि क्रिकेट या देशी व लोकप्रिय खेळांतील प्राविण्य प्राप्त खेळाडूंनाही ५ टक्के खेळाडू आरक्षणासाठी पात्र ठरविण्यात आले आहे.
दरम्यान, खेळाडूंच्या क्रीडा प्रमाणपत्रांशी संबंधित अडचणी व तक्रारींचे निराकरण करण्यासाठी स्वतंत्र समिती गठित करण्यात येणार आहे. या समितीचे अध्यक्ष सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा हे असतील. त्यांच्यासोबत समितीत आणखी चार सदस्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
या सुधारित धोरणामुळे राज्यातील प्राविण्य प्राप्त खेळाडूंना शासकीय व निमशासकीय सेवांमध्ये रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here