प्रिन्स रहीम आगा खान यांचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले स्वागत; शिक्षण, पर्यावरण व हवामान कृतीवर चर्चा
प्रिन्स रहीम आगा खान यांचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले स्वागत; शिक्षण, पर्यावरण व हवामान कृतीवर चर्चा
मुंबई :
शिया इस्माईली मुस्लिम समाजाचे पाचवे इमाम आणि आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कचे (AKDN) अध्यक्ष प्रिन्स रहीम आगा खान पाचवे यांचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी लोकभवन येथे स्वागत केले. यावेळी महाराष्ट्रातील विद्यापीठे व शैक्षणिक संस्थांमध्ये ‘सूक्ष्म वन’ (Micro Forest) उपक्रम, पर्यावरण संवर्धन आणि हवामान कृतीच्या क्षेत्रात सहकार्य करण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.
तीव्र हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पुणे, मीरा-भाईंदर, चंद्रपूर यांसह विविध शहरांमध्ये हवामान कृती, उत्सर्जन कमी करणे आणि शीतकरण उपाययोजनांवर AKDNच्या माध्यमातून काम सुरू असल्याची माहिती प्रिन्स रहीम आगा खान यांनी राज्यपालांना दिली. तसेच वसई परिसरातील तलाव व जलस्रोतांच्या पुनरुज्जीवनासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे भूजल पातळी वाढण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील आदिवासी आणि ग्रामीण भागातील उपजीविका विकासाच्या क्षेत्रातही आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कने काम करण्याचा विचार करावा, अशी अपेक्षा राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी व्यक्त केली. शिक्षण, पर्यावरण, हवामान कृती आणि उपजीविका विकासातील भागीदारीमुळे जनतेला दीर्घकालीन आणि अर्थपूर्ण लाभ मिळू शकतील, असे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्यपाल वर्मा यांनी प्रिन्स रहीम आगा खान यांना त्यांचे दिवंगत वडील करीम आगा खान चौथे आणि मातोश्री यांचे तत्कालीन राज्यपालांसोबतच्या गेल्या ५० वर्षांतील छायाचित्रांचा विशेष अल्बम भेट दिला. राजभवनातील वडिलांच्या आठवणींना उजाळा देणारी छायाचित्रे पाहून प्रिन्स रहीम आगा खान भावूक झाले. “हे खरोखरच भावुक करणारे आहे. अप्रतिम!” अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.