फोंडा घाटातील ‘अपघात’ प्रकरणाचा पाच वर्षांनी उलगडा; पैशाच्या वादातून खून, चार आरोपी ताब्यात

0
21
फोंडा घाटातील ‘अपघात’ प्रकरणाचा पाच वर्षांनी उलगडा; पैशाच्या वादातून खून, चार आरोपी ताब्यात
फोंडा घाटातील ‘अपघात’ प्रकरणाचा पाच वर्षांनी उलगडा; पैशाच्या वादातून खून, चार आरोपी ताब्यात

फोंडा घाटातील ‘अपघात’ प्रकरणाचा पाच वर्षांनी उलगडा; पैशाच्या वादातून खून, चार आरोपी ताब्यात

कणकवली | प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा घाटात मोटारसायकलसह आढळलेल्या मृतदेहाच्या गूढ प्रकरणाचा तब्बल पाच वर्षांनंतर उलगडा झाला असून हा अपघात नसून नियोजित खून असल्याचे तपासातून समोर आले आहे. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ०७ ने गोपनीय माहितीच्या आधारे तपास करत चार आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपासासाठी त्यांना कणकवली पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत अश्पाक याच्यासोबत झालेल्या पैशांच्या देवाणघेवाणीच्या वादातून आरोपींनी संगनमताने त्याला कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये बोलावले. तेथे मध्यरात्रीच्या सुमारास त्याच्यावर बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह आणि मोटारसायकल फोंडा घाटातील नदी परिसरात फेकण्यात आली. तसेच हा रस्ता अपघात असल्याचा बनाव रचण्यात आला.
या प्रकरणी मनोज भडगे, सुरेंद्र सोनवडेकर, अतिष मोरे आणि ऋतुराज शेट्टी या चार आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या गुन्ह्यातील आणखी दोन संशयित आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
स्थानिक गुन्हे शाखा, मुंबई कक्ष ०७ यांना प्राप्त झालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे मानवी कौशल्य आणि तांत्रिक तपासाचा वापर करून हा गुन्हा उघडकीस आणण्यात आला. कणकवली पोलीस आरोपींकडे अधिक चौकशी करत असून या प्रकरणात आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
या कारवाईसाठी मुंबई पोलीस आयुक्त देवेन भारती, सहआयुक्त (गुन्हे) अनिल कुंभारे, अप्पर पोलीस आयुक्त कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपआयुक्त नवनाथ ढवळे, सहाय्यक पोलीस आयुक्त निनाद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत, एपीआय सुहास खरमाटे, वैशाली सरवदे, रामदास कदम तसेच इतर अधिकाऱ्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here