बागमांडला येथे दुर्मीळ नर ग्रीन सी कासव आढळले

0
68
बागमांडला येथे दुर्मीळ नर ग्रीन सी कासव आढळले
बागमांडला येथे दुर्मीळ नर ग्रीन सी कासव आढळले

बागमांडला येथे दुर्मीळ नर ग्रीन सी कासव आढळले

वनविभाग व कासव मित्रांच्या प्रयत्नाने नैसर्गिक अधिवासात सोडण्यात यश

श्रीवर्धन l प्रतिनिधी

श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला येथे फेरीबोटीच्या नव्या जेट्टीजवळ चिखलात अडकलेले मोठे सागरी कासव आढळून आले. याची माहिती तेथे कार्यरत असलेले आकाश पाडलेकर यांनी तत्काळ दक्षिण कोकण वनविभागाच्या कांदळवन कक्ष कार्यालयाला दिली. माहिती मिळताच अधिनस्त वनरक्षक, कासव तज्ज्ञ आणि कासव मित्र यांनी घटनास्थळी धाव घेतली.

तपासणीत हे कासव ग्रीन सी (Green Sea Turtle) या दुर्मीळ प्रजातीचे नर असल्याचे निष्पन्न झाले. पाण्याला ओहोटी लागल्याने हे कासव किनाऱ्यावर वाहून आले होते. वन कर्मचाऱ्यांनी तपासणी केली असता कासवाला कोणतीही इजा झाल्याचे आढळून आले नाही.

रायगड जिल्ह्यातील सागरी क्षेत्रात सागरी कासवांच्या पाच प्रजाती आढळतात, मात्र श्रीवर्धन तालुक्यातील बागमांडला येथे नर ग्रीन सी कासव प्रथमच आढळल्याची नोंद कांदळवन प्रतिष्ठानचे सहाय्यक संशोधक मोहन उपाध्ये यांनी केली. या कासवाचे अंदाजे वजन २०० किलो, एकूण लांबी १९० सेंमी, पाठीची लांबी ६५ सेंमी, रुंदी ६२.५ सेंमी आणि शेपटी ३६ सेंमी इतकी होती.

कासव संवर्धनासाठी वनविभाग व कासव संवर्धन प्रकल्पाच्या सदस्यांनी तत्परतेने काम करून या कासवाला नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे मुक्त केले. या कार्यात मारळ येथील जयंत कानडे, संकेत मयेकर, हरिहरेश्वर येथील संतोष मयेकर, सुबोध खोपटकर, कासव मित्र, कांदळवन विभागाचे अधिनस्त वनरक्षक तुषार बाप्पासाहेब भटे, ऋषिकेश लव्हटे, कासव तज्ज्ञ मोहन उपाध्ये, स्थानिक ग्रामस्थ आणि फेरीबोटी वरील कर्मचाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले.

यापूर्वी रायगड जिल्ह्यातील किनाऱ्यावर किंवा खाडीत ग्रीन सी कासवांच्या माद्या आढळल्या आहेत, मात्र नर ग्रीन सी कासव सापडण्याची ही पहिलीच घटना बागमांडला येथे घडली आहे.

दरम्यान, अशा प्रकारे समुद्री कासव आढळल्यास तात्काळ कांदळवन विभागाला कळवावे, असे आवाहन दक्षिण कोकण कांदळवन विभागाच्या विभागीय वन अधिकारी श्रीमती कांचन पवार यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here