कोकणच्या हवाई दळणवळणात ऐतिहासिक टप्पा; चिपी विमानतळाला IFR परवाना
सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
कोकणच्या विकासाला गती देणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडीत चिपी विमानतळाला DGCA कडून IFR लायसन्स आणि नियमित ऑपरेशन्ससाठी अंतिम मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे आता कोणत्याही हवामानात तसेच रात्रंदिवस सुरक्षित विमानसेवा सुरू ठेवणे शक्य होणार आहे.
या मंजुरीमुळे नाईट लँडिंग सुविधा अधिकृत झाली असून पर्यटन, व्यापार, औद्योगिक आणि आपत्कालीन विमानसेवांना मोठा फायदा होणार आहे.
ही सुविधा मिळवण्यासाठी खासदार नारायण राणे व आमदार नितेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश आले. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा नियोजन समितीच्या अडीच कोटींच्या निधीतून आवश्यक वीजपुरवठा व्यवस्था पूर्ण करण्यात आली. सर्व तांत्रिक अटी पूर्ण झाल्यानंतर DGCA ने ही मंजुरी दिली आहे.
या निर्णयामुळे सिंधुदुर्ग व कोकणच्या हवाई दळणवळणाला नवे बळ मिळाले आहे.


