नेमळे गावात हत्तीरोगाचे संशयित रुग्ण आढळले

0
90
नेमळे गावात हत्तीरोगाचे संशयित रुग्ण आढळले
नेमळे गावात हत्तीरोगाचे संशयित रुग्ण आढळले

नेमळे गावात हत्तीरोगाचे संशयित रुग्ण आढळले

आरोग्य विभागाकडून तातडीची उपाययोजना

सावंतवाडी l प्रतिनिधी

सावंतवाडी तालुक्यातील नेमळे गावात हत्तीरोगाचे संशयित रुग्ण आढळल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. झारखंड येथून वीटभट्टीवर कामासाठी आलेल्या २८ मजुरांपैकी ४ कामगारांमध्ये हत्तीरोगसदृश लक्षणे आढळून आली असून, आरोग्य विभागाने तातडीने उपचार व प्रतिबंधात्मक उपाय सुरू केले आहेत.

शासनाच्या आदेशानुसार परराज्यातून येणाऱ्या कामगारांची आरोग्य तपासणी करणे बंधनकारक आहे. त्यानुसार नेमळे येथील वीटभट्टीवर कार्यरत झारखंडमधील २८ कामगारांच्या रक्तनमुने आरोग्य विभागामार्फत तपासणीसाठी घेण्यात आले. प्राथमिक तपासणीत चार कामगारांमध्ये हत्तीरोगसदृश लक्षणे आढळून आली.

संबंधित चारही कामगारांवर सध्या आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली उपचार सुरू असून, त्यांच्या रक्तनमुने पुन्हा सखोल तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहेत. पुढील तपासणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यास खबरदारीचा उपाय म्हणून या कामगारांना त्यांच्या मूळ गावी परत पाठविण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे.

ग्रामपंचायतीकडून प्रतिबंधात्मक उपाय
हत्तीरोग हा डासांमार्फत पसरणारा आजार असल्याने नेमळे ग्रामपंचायतीने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. गावातील संबंधित भागात तसेच वीटभट्टी परिसरात जंतूनाशक औषधांची फवारणी करण्यात आली आहे.

दरम्यान, नागरिकांनी घाबरून न जाता डासांपासून संरक्षणासाठी आवश्यक खबरदारी घ्यावी, स्वच्छता राखावी आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here