बिनविरोध निवडणुकांवर राज–उद्धव ठाकरे यांची संयुक्त टीका
लोकशाहीचा अपमान असल्याचा आरोप
मुंबई l प्रतिनिधी
राज्यात झालेल्या बिनविरोध निवडणुकांवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत तीव्र टीका केली. भाजप आणि महायुतीवर लोकशाही मूल्यांना हरताळ फासल्याचा आरोप करत दोन्ही नेत्यांनी सत्तेच्या दुरुपयोगाचा मुद्दा उपस्थित केला.
राज ठाकरे म्हणाले की, पश्चिम बंगालमधील बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांविरोधात भाजप सर्वोच्च न्यायालयात गेले होते, मग आता महाराष्ट्रात महायुतीच्या बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांबाबत भाजपची भूमिका काय आहे, हे स्पष्ट व्हावे. सत्ता कायमस्वरूपी नसते, हा इतिहास असून, सत्तेच्या जोरावर मनमानी करणाऱ्यांनी आपल्या विचारांवर पुनर्विचार करावा, असा इशाराही त्यांनी दिला. महाराष्ट्राला उत्तर प्रदेश–बिहार बनवण्याचा प्रयत्न सुरू असून, महाराष्ट्राने नेहमीच देशाला दिशा दिली आहे, असेही राज ठाकरे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी कल्याण–डोंबिवली आणि ठाण्यातील बिनविरोध निवडणुकांना लोकशाहीचा अपमान ठरवले. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी अधिकारांचा दुरुपयोग करत दमदाटी केल्याचा आरोप त्यांनी केला. अध्यक्ष हे संपूर्ण विधिमंडळाचे असतात, कोणत्याही पक्षाचे नसतात, त्यामुळे त्यांनी निःपक्षपाती भूमिका घ्यावी अपेक्षित असते. मात्र प्रत्यक्षात त्यांनी उद्दाम वर्तन केले असून, त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून तत्काळ निलंबन करावे, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
राज्यात बिनविरोध निवडणुका लादून मतदारांना मतदानाच्या हक्कापासून वंचित ठेवण्याचा हा भाजपचा डाव असल्याचा आरोप करत, लोकशाहीच्या रक्षणासाठी एकत्रित लढा उभारण्याचे संकेतही या पत्रकार परिषदेत देण्यात आले.


