रायगड जिल्ह्यात 1 ते 31 जानेवारी 2026 दरम्यान मोफत कर्करोग तपासणी मोहीम
रायगड l प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यात कर्करोगाचा लवकर शोध लागून रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, या उद्देशाने दि. 1 जानेवारी ते 31 जानेवारी 2026 या कालावधीत विशेष मोफत कर्करोग तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निशिकांत पाटील यांनी केले आहे.
उपसंचालक, आरोग्य सेवा ठाणे यांच्या स्तरावरून रायगड जिल्ह्यासाठी कॅन्सर व्हॅन उपलब्ध करून देण्यात येणार असून, निश्चित कृती आराखड्यानुसार (ए.टी.पी.) ही मोहीम राबविली जाणार आहे. या कॅन्सर व्हॅनच्या माध्यमातून जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागांपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविण्यात येणार आहे.
या तपासणी मोहिमेदरम्यान कॅन्सर व्हॅनसोबत एक स्त्रीरोगतज्ज्ञ, एक दंत शल्यचिकित्सक तसेच एक सहाय्यक परिचारिका उपस्थित राहणार असून, प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून गावागावातील नागरिकांची कर्करोग तपासणी करण्यात येणार आहे. एका दिवसात किमान 150 नागरिकांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे.
कर्करोगासारख्या गंभीर आजाराबाबत नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करणे, आजाराचा प्रारंभीच शोध घेऊन उपचार सुरू करणे तसेच ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना सुलभ आरोग्यसेवा उपलब्ध करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


