बीएलओ कामाविरोधात कुडाळमध्ये प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन; जिल्हाभर आंदोलनाचा इशारा
कुडाळ | प्रतिनिधी
बीएलओ (बूथ लेव्हल ऑफिसर) काम शिक्षकांवर लादण्यात येत असल्याच्या विरोधात कुडाळ तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांनी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कुडाळ यांच्या नेतृत्वाखाली एकवटत मंगळवारी कुडाळ तहसीलदार कार्यालयासमोर लाक्षणिक धरणे आंदोलन केले. हे आंदोलन सायंकाळी ४ ते ६ या वेळेत शांततेच्या मार्गाने पार पडले.
या आंदोलनादरम्यान शिक्षकांनी बीएलओचे अशैक्षणिक काम करण्यास तीव्र विरोध दर्शवला. शिक्षकांचे मुख्य कार्य अध्यापन असून निवडणूक प्रक्रियेतील बीएलओसारखी जबाबदारी ही शिक्षणाच्या गुणवत्तेवर परिणाम करणारी असल्याचा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी उपस्थित केला.
प्राथमिक शिक्षक समितीने स्पष्ट भूमिका मांडत आजपासून बीएलओचे काम पूर्णतः बंद करण्याचा निर्णय जाहीर केला. प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घेऊन शिक्षकांना अशैक्षणिक कामातून मुक्त करावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.
जर प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा प्राथमिक शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला. आंदोलनामुळे तहसील कार्यालय परिसरात काही काळ लक्षवेधी वातावरण निर्माण झाले होते.


