बुधवळेतील वन्यप्राण्यांच्या उपद्रवाची वनविभागाकडून तात्काळ दखल

0
7
बुधवळेतील वन्यप्राण्यांच्या उपद्रवाची वनविभागाकडून तात्काळ दखल
बुधवळेतील वन्यप्राण्यांच्या उपद्रवाची वनविभागाकडून तात्काळ दखल

बुधवळेतील वन्यप्राण्यांच्या उपद्रवाची वनविभागाकडून तात्काळ दखल

नुकसानग्रस्त शेतांची पाहणी; शेतकऱ्यांना नुकसानभरपाईसह सर्वतोपरी मदतीचे आश्वासन

आचरा-विवेक परब
बुधवळे परिसरात रानगवे व वानरांच्या वाढत्या उपद्रवामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून वन्यप्राण्यांचा लोकवस्तीतील वावरही वाढला आहे. या गंभीर समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते समीर मुणगेकर यांनी दिलेल्या निवेदनाची वनविभागाने तात्काळ दखल घेत बुधवारी (दि. ५ ऑगस्ट) नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली.

उपवन संरक्षक मिलिश शर्मा (IFS) व सहाय्यक वनसंरक्षक डॉ. सुनील लाड यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल चेतन पाटील यांनी अधिनस्त कर्मचाऱ्यांसह बुधवळे (मळेशेतवाडी) येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. यानंतर बुधवळे येथील विठ्ठल मंदिरात बुधवळे पंचक्रोशीतील शेतकरी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. बैठकीत वन्यप्राण्यांमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीबाबत शासनाकडून मिळणाऱ्या नुकसानभरपाईची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे आणि अर्ज सादर करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी वनविभागाकडून आवश्यक ते सर्व सहकार्य केले जाईल, अशी ग्वाही ही यावेळी देण्यात आली.
तसेच वन्यजीव संरक्षण, वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांपासून बचावासाठी घ्यावयाची काळजी आणि सुरक्षिततेच्या उपाय योजनां बाबतही उपस्थितांना माहिती देण्यात आली. वन क्षेत्रपाल चेतन पाटील यांनी शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करण्याबरोबरच भविष्यात अप्रिय घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना राबविण्यात येतील, असे आश्वासन दिले.
वनविभागाने समस्येची तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्ष पाहणी व मार्गदर्शन केल्याबद्दल शेतकरी आणि ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. सामाजिक कार्यकर्ते समीर मुणगेकर यांनी वन विभागाचे आभार मानत, शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर यापुढेही तत्परतेने कार्यवाही व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी वनक्षेत्रपाल चेतन पाटील, सरपंच श्री. पानवलकर, सामाजिक कार्यकर्ते समीर मुणगेकर, सामाजिक कार्यकर्ते श्री. परुळेकर, वनपाल सदानंद परब, वनरक्षक अतुल खोत, वनरक्षक लक्ष्मण आमले, आरआरटी कुडाळ व मालवणचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, शेतकरी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here