बुलढाणा घटना; बोगस मतदान प्रकरणावर रोहित पवारांचे सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप
बुलढाणा – निवडणूक प्रक्रियेत बोगस मतदारांच्या माध्यमातून मोठा घोळ सुरू असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी सत्ताधाऱ्यांवर तीव्र निशाणा साधला आहे.
हे पण वाचा महाराष्ट्रातील २४ नगरपरिषद व नगरपंचायतींसाठी २० डिसेंबरला मतदान
रोहित पवार म्हणाले की, “आम्ही अनेक वेळा निवडणूक आयोगाला दुबार व बोगस मतदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. परंतु आयोगाने याकडे अजिबात लक्ष दिले नाही.”
बुलढाण्यातील धक्कादायक घटनेचा उल्लेख करत ते पुढे म्हणाले, “स्थानिकांनी बोगस मतदार पकडला होता. मात्र बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा मुलगा व पुतण्या यांनी पोलिसांशी वाद घालत त्या बोगस मतदाराला पळवून लावले. यावरून सत्ताधारी लोक दिवसाढवळ्या मतदान प्रक्रियेत कसा हस्तक्षेप करत आहेत, हे स्पष्ट दिसून येते.”
पवार यांनी आयोगावरही गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “सत्ताधाऱ्यांविरोधात काहीच कारवाई करायची नाही असा निर्णय आयोगाने घेतलाय का? बोगस मतदान थांबवण्यासाठी आयोगाचे प्रयत्न अतिशय कमकुवत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
या संपूर्ण प्रकरणामुळे बुलढाण्यात निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेबाबत प्रश्न निर्माण झाले आहेत.


