भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर मंत्री गिरीष महाजन यांची घटनास्थळी भेट
भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर मंत्री गिरीष महाजन यांची घटनास्थळी भेट
बचावकार्याचा घेतला आढावा
कोहिनूर इमारत दुर्घटनेतील मृतांना श्रद्धांजली; प्रशासनाला तातडीच्या सूचना
भिवंडी :
ठाणे जिल्ह्यातील भिवंडी शहरातील नारपोली परिसरातील कोहिनूर इमारतीचा काही भाग कोसळून झालेल्या दुर्दैवी दुर्घटनेनंतर राज्याचे मंत्री गिरीष महाजन यांनी घटनास्थळी भेट देत सुरू असलेल्या बचाव आणि मदतकार्याचा सविस्तर आढावा घेतला.
भिवंडी इमारत दुर्घटनेनंतर मंत्री गिरीष महाजन यांची घटनास्थळी भेट
यावेळी त्यांनी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, अग्निशमन दल, पोलीस प्रशासन तसेच संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांकडून बचाव मोहिमेची माहिती घेतली. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सर्व यंत्रणा युद्धपातळीवर कार्यरत असून प्रत्येक जीव वाचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
दुर्घटनेत काही नागरिकांचा मृत्यू झाल्याबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत गिरीष महाजन यांनी मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. तसेच मृतांच्या कुटुंबीयांच्या दुःखात शासन सहभागी असल्याची भावना व्यक्त केली.
जखमींवर आवश्यक वैद्यकीय उपचार सुरू असून त्यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, अशी प्रार्थना त्यांनी व्यक्त केली. बचावकार्य अधिक प्रभावीपणे राबवून कोणतीही हयगय होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार बाळ्यामामा म्हात्रे तसेच शासनाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.