भीमाशंकर मंदिर परिसराच्या विकास आराखड्याला गती देण्याचे जिल्हाधिकारी डुडी यांचे निर्देश
भीमाशंकर मंदिर परिसराच्या विकास आराखड्याला गती देण्याचे जिल्हाधिकारी डुडी यांचे निर्देश
गावांचे नियोजनबद्ध पुनर्वसन; मूलभूत सुविधांसह आदर्श गाव उभारणार
पुणे :
भीमाशंकर मंदिर व परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या विकास आराखड्याची प्रभावी अंमलबजावणी करून कामांना गती द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. मंदिर परिसराचा विकास करताना स्थानिक ग्रामस्थांचे नियोजनबद्ध पुनर्वसन, भाविकांसाठी आवश्यक सुविधा आणि पर्यावरण संवर्धन यांचा समन्वय साधण्यावर भर देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात भीमाशंकर मंदिर व परिसराच्या विकास आराखड्याबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी आमदार बाबाजी काळे आणि जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर उपस्थित होते.
विकास आराखड्यांतर्गत ग्रामस्थांना त्यांच्या विद्यमान जमिनीच्या क्षेत्रफळानुसार भूखंड देण्यात येणार असून, त्यासोबत १ बीएचके, २ बीएचके आणि ३ बीएचके स्वरूपातील सुसज्ज घरे बांधून देण्यात येणार आहेत. नव्या गावात ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, अंगणवाडी, शाळा, बहुउद्देशीय सभागृह, समाजमंदिर, अन्नछत्र, पार्किंग, सार्वजनिक स्वच्छतागृहे, पाणीपुरवठा, पथदिवे, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
मंदिर परिसरातून गावाला जोडणारा कॉरिडॉर विकसित करण्यात येणार असून, भाविकांसाठी प्रसादगृह, होल्डिंग एरिया, बसण्याची व्यवस्था आणि स्वच्छतागृहे उभारण्यात येणार आहेत. दर्शनानंतर भाविकांना पायरी मार्गाने गावात जाता येणार असल्याने स्थानिक ग्रामस्थांच्या व्यवसायाला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
नदी व कुंड परिसराची स्वच्छता, फेन्सिंग तसेच भाविकांसाठी सुरक्षित तीर्थस्नानाची व्यवस्था करण्याबाबतही बैठकीत चर्चा करण्यात आली. विकासकामे करताना ग्रामस्थांच्या सूचना व सहकार्य घेऊन कामे वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डुडी यांनी दिल्या.
पावसाळ्यानंतर ऑक्टोबर २०२६ पासून कामांना गती देऊन जून २०२७ पर्यंत प्रकल्प पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. विकासकामांनंतर परिसरात अतिक्रमण किंवा अनधिकृत बांधकाम होऊ नये, यासाठी स्थानिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले.
बैठकीत भीमाशंकर मंदिर व परिसराच्या विकास आराखड्याची चित्रफित दाखविण्यात आली. विकासकामे पूर्ण झाल्यानंतर गाव व परिसराचे नियोजित स्वरूप कसे असेल, याबाबत ग्रामस्थांना सविस्तर माहिती देण्यात आली. बैठकीस भीमाशंकर मंदिराचे विश्वस्त, ग्रामस्थ तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.