मणिपूरच्या छोट्या गावातून पंतप्रधानांच्या सुरक्षेपर्यंत; अदासो कापेसा ठरल्या प्रेरणादायी
मणिपूर : मणिपूरमधील एका छोट्या गावातून प्रवास सुरू करून देशाच्या पंतप्रधानांच्या सुरक्षेपर्यंत पोहोचलेली अदासो कापेसा यांची कामगिरी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे. मणिपूरमधील कैबी गावातील अदासो कापेसा या पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या Special Protection Group या देशातील उच्च सुरक्षा दलात स्थान मिळवणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत.
पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी १९८५ मध्ये स्थापन करण्यात आलेल्या या विशेष सुरक्षा दलात आतापर्यंत पुरुषांचेच वर्चस्व राहिले होते. मात्र अ
दासो कापेसा यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि कठोर प्रशिक्षणाच्या जोरावर या क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
कापेसा यांनी आपल्या सेवाकाळाची सुरुवात Sashastra Seema Bal या केंद्रीय सशस्त्र पोलिस दलातून केली. भारताच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या या दलात काम करताना त्यांनी कठोर प्रशिक्षण आणि शिस्तीच्या जोरावर आपली क्षमता सिद्ध केली. त्यानंतरच्या प्रवासात त्यांनी देशातील सर्वात महत्त्वाच्या सुरक्षा दलात प्रवेश मिळवला.
अलीकडेच पंतप्रधानांसोबत युनायटेड किंग्डम दौऱ्यादरम्यान त्यांच्या उपस्थितीचे छायाचित्र सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. त्या छायाचित्रातून केवळ गणवेशातील अधिकारीच नव्हे तर मोठी स्वप्ने पाहणाऱ्या तरुणींना प्रेरणा देणारी एक प्रतिमा लोकांसमोर आली.
मणिपूरच्या छोट्या गावातून देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाच्या सुरक्षेपर्यंत पोहोचलेली अदासो कापेसा यांची कहाणी प्रत्येक मुलीला मोठी स्वप्ने पाहण्याची आणि ती पूर्ण करण्यासाठी जिद्दीने प्रयत्न करण्याची प्रेरणा देणारी ठरत आहे.


