मतदान जनजागृतीसाठी ईव्हीएम मॅस्कॉटला नवी मुंबईकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
नवी मुंबई l प्रतिनिधी
नवी मुंबई महानगरपालिकेच्या १५ जानेवारी रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये मतदानाबाबत जागृती करण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार प्रत्येक मतदाराने बजावावा, यासाठी महानगरपालिका प्रशासनाकडून व्यापक प्रमाणात जनजागृती केली जात असून यंदा प्रथमच चार सदस्यीय पॅनल पद्धतीने निवडणूक होत असल्याने मतदानाची प्रक्रिया कशी करायची, याची माहितीही नागरिकांपर्यंत पोहोचवली जात आहे.
निवडणूकविषयक माहिती प्रभावीपणे प्रसारित करण्यासाठी नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मतदान यंत्र अर्थात ईव्हीएम मशीनचा मॅस्कॉट तयार करण्यात आला आहे. हा मॅस्कॉट शहरातील वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांना भेट देत १५ जानेवारी रोजी आवर्जून मतदान करण्याचे आवाहन करत आहे.
या ईव्हीएम मॅस्कॉटला नवी मुंबईकर नागरिकांकडून, विशेषतः लहान मुलांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून तो जनजागृतीचा प्रभावी माध्यम ठरत आहे. नागरिक मॅस्कॉटसोबत संवाद साधत मतदान प्रक्रियेबाबत माहिती घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अशा विविध कल्पक आणि लोकाभिमुख उपक्रमांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.


