महाराष्ट्रात स्वीडिश गुंतवणुकीला चालना; पुणे-नाशिकदरम्यान औद्योगिक समूह उभारण्यावर विचार
महाराष्ट्रात स्वीडिश गुंतवणुकीला चालना; पुणे-नाशिकदरम्यान औद्योगिक समूह उभारण्यावर विचार
स्वीडनच्या राजदूत पेट्रा मेनांडर यांची मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट;
संरक्षण उत्पादन, एरोस्पेस, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कृषी क्षेत्रांतील सहकार्यावर चर्चा
मुंबई :
स्वीडनमधील प्रगत तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची उत्पादन क्षमता यांची सांगड घालून राज्यात आधुनिक तंत्रज्ञानाधारित उद्योग उभारण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्यात येणार आहेत. मुंबई-पुण्याबरोबरच महाराष्ट्रातील इतर भागांतही स्वीडिश उद्योजकांनी गुंतवणूक करावी, यासाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील, असे आश्वासन राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी दिले.
स्वीडनच्या राजदूत पेट्रा मेनांडर यांनी सह्याद्री अतिथिगृह येथे मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान महाराष्ट्र आणि स्वीडन यांच्यातील औद्योगिक गुंतवणूक आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याच्या संधींबाबत चर्चा करण्यात आली.
संरक्षण उत्पादन, एरोस्पेस, कृत्रिम बुद्धिमत्ता, कृषी आणि दुग्धव्यवसाय या क्षेत्रांमध्ये दोन्ही देशांमधील सहकार्य वाढविण्यावर भर देण्यात आला. पुणे ते नाशिकदरम्यान स्वीडिश कंपन्यांसाठी औद्योगिक समूह विकसित करण्याच्या शक्यतेवरही विचारविनिमय झाला. या उद्योगांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा आणि निवासव्यवस्था उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
स्वीडनमधील आधुनिक तंत्रज्ञानाचा महाराष्ट्रातील उद्योगांमध्ये वापर वाढविणे, कौशल्य विकास आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या माध्यमातून स्थानिक उत्पादन क्षमता मजबूत करणे, तसेच उत्पादनांचे मूल्यवर्धन वाढविणे यावर यावेळी विशेष भर देण्यात आला. आधुनिक दुग्धव्यवसाय तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्याच्या संधींचाही विचार करण्यात आला.
याशिवाय, दोन्ही देशांतील विद्यार्थी, संशोधक आणि शेतकरी यांच्यात अनुभवांची देवाणघेवाण वाढविण्याबाबत चर्चा झाली. औद्योगिक सहकार्य आणि गुंतवणुकीला प्रोत्साहन देतानाच महाराष्ट्र आणि स्वीडन यांच्यातील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्यावरही भर देण्यात आला.
स्वीडनचे तंत्रज्ञान आणि महाराष्ट्राची औद्योगिक क्षमता यांचा समन्वय साधल्यास राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये आधुनिक उद्योगांच्या विकासासाठी आणि स्थानिक उत्पादनाला चालना देण्यासाठी सहकार्याच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात.