हुंडाबळी व सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती; परबवाडा-आंब्रड येथे विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम

0
11
हुंडाबळी व सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती; परबवाडा-आंब्रड येथे विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम
हुंडाबळी व सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती; परबवाडा-आंब्रड येथे विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम

हुंडाबळी व सामाजिक अनिष्ट प्रथांविरोधात जनजागृती; परबवाडा-आंब्रड येथे विधी सेवा प्राधिकरणाचा उपक्रम

महिलांचे हक्क, मुलींचे शिक्षण आणि स्वावलंबनावर भर; हुंडाविरोधी कायद्यांची माहिती समाजापर्यंत पोहोचविण्याचे आवाहन

सिंधुदुर्ग :
हुंडाबळी आणि सामाजिक अनिष्ट प्रथांचे उच्चाटन करून महिलांना सुरक्षित, सन्मानाचे आणि समानतेचे जीवन मिळवून देण्यासाठी समाजात व्यापक जनजागृती होणे आवश्यक आहे. याच उद्देशाने सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या वतीने पोषण माह सप्ताहानिमित्त हुंडाबळी व सामाजिक अनिष्ट प्रथा या विषयावर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, परबवाडा-आंब्रड येथे हा कार्यक्रम पार पडला.
सिंधुदुर्गचे प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष डॉ. सुधीर देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा दीपलक्ष्मी पडते, लोक अभिरक्षक श्वेता तेंडुलकर आणि लोक अभिरक्षक कार्यालयातील रुचा लोखंडे उपस्थित होत्या.
कार्यक्रमात दीपलक्ष्मी पडते यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. लोक अभिरक्षक श्वेता तेंडुलकर यांनी हुंडाबळीच्या गंभीर समस्येवर प्रकाश टाकताना हुंड्याच्या मागणीवरून विवाहित महिलांचा होणारा मानसिक व शारीरिक छळ, मारहाण आणि हुंड्यासंबंधीच्या छळामुळे घडणाऱ्या मृत्यूच्या घटनांबाबत माहिती दिली.
हुंडा देणे आणि घेणे या प्रथेला विरोध करणे, मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देणे, महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनविणे आणि महिलांवरील अत्याचारांविरोधात आवाज उठविणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच हुंडाविरोधी कायद्यांची माहिती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवून या सामाजिक समस्येच्या उच्चाटनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन केले.
लोक अभिरक्षक कार्यालयातील रुचा लोखंडे यांनी सामाजिक अनिष्ट प्रथांमुळे समाजाच्या प्रगतीत अडथळे निर्माण होत असून, व्यक्तींच्या हक्कांवर आणि जीवनावर त्यांचे विपरीत परिणाम होतात, असे स्पष्ट केले. या प्रथा रोखण्यासाठी शिक्षणाचा प्रसार, व्यापक जनजागृती, स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन आणि अंधश्रद्धा व भेदभावाला विरोध करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.
समाजसुधारकांच्या विचारांचा प्रसार करून कायद्यांचे पालन करणे आणि सामाजिक परिवर्तनासाठी सक्रिय योगदान देणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. महिलांचे हक्क आणि सामाजिक समानतेबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here