महाराष्ट्रात ३ पैकी २ मुली शिक्षणापासून वंचित

0
181
महाराष्ट्रात ३ पैकी २ मुली शिक्षणापासून वंचित
महाराष्ट्रात ३ पैकी २ मुली शिक्षणापासून वंचित

महाराष्ट्रात ३ पैकी २ मुली शिक्षणापासून वंचित

 ‘बेटी बचाव बेटी पढाव’ फक्त घोषणाच? – विलास लवांडे

महाराष्ट्रात मुलींच्या शिक्षणाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली असून राज्यातील तब्बल ६६ टक्के मुली शाळेबाह्य असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट)चे प्रदेश प्रवक्ता तथा संघटक सचिव विलास लवांडे यांनी केला आहे. ज्या महाराष्ट्रात महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली, त्याच राज्यात आज मुली शिक्षणापासून वंचित राहत असतील तर ही अत्यंत दुर्दैवी आणि धोक्याची बाब असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

लवांडे म्हणाले की, विशेषतः ग्रामीण भागातील परिस्थिती अधिक भीषण झाली आहे. सरकारी शाळांमध्ये शिक्षकांची तीव्र कमतरता असून हजारो शिक्षकांची पदे अद्याप रिक्त आहेत. अशा परिस्थितीत मुलींना शिक्षण मिळणे अवघड होत आहे. मुलगी शाळेबाह्य राहणे ही केवळ आकडेवारीची बाब नसून तिच्या संपूर्ण आयुष्यावर परिणाम करणारी गंभीर समस्या आहे. शिक्षणाअभावी तिची सर्वांगीण प्रगती खुंटते आणि भविष्यातील संधीही हिरावल्या जातात.

केंद्र सरकारने नुकतीच जाहीर केलेली आकडेवारी धक्कादायक असून राज्यातील १५ हजारांहून अधिक किशोरवयीन मुली शिक्षणापासून वंचित असल्याचे त्यातून स्पष्ट झाले आहे. कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाचा सर्वाधिक फटका मुलींच्या शिक्षणाला बसत असल्याचेही त्यांनी नमूद केले. गेल्या पाच वर्षांत देशभरात ६७.५ लाख विद्यार्थ्यांनी शाळा सोडली असून त्यातील सुमारे २९.८ लाख किशोरवयीन मुली असल्याचे वास्तव सरकारसाठी लाजिरवाणे असल्याचे लवांडे यांनी सांगितले.

ग्रामीण भागात आधीच शिक्षणाची साधने मर्यादित असताना फडणवीस सरकारकडून हजारो शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला जात असल्याने मुलींच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. ‘हेच का भाजप सरकारचे बेटी बचाव बेटी पढाव धोरण?’ असा सवाल उपस्थित करत नुसत्या घोषणा आणि जाहिरातबाजीने महिलांचे प्रश्न सुटणार नाहीत, तर ठोस धोरणे आणि प्रभावी अंमलबजावणीची गरज असल्याचे विलास लवांडे यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here