महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीगची घोषणा; ग्रामीण भागातील १,६०० खेळाडूंना मिळणार संधी – मंत्री उदय सामंत
‘गल्लीपासून स्टेडियमपर्यंत’ खेळाडूंचा प्रवास घडविण्याचा प्रयत्न; स्पर्धेतील निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार
महाराष्ट्र :
राज्यातील ग्रामीण आणि शहरी भागांतील गुणवंत टेनिस क्रिकेटपटूंना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी ‘महाराष्ट्र टेनिस क्रिकेट चॅम्पियन लीग’च्या पहिल्या पर्वाची घोषणा करण्यात आली. राज्याचे मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गावागावांतील खेळाडूंना मोठ्या स्तरावर खेळण्याची संधी मिळावी आणि त्यांच्या प्रतिभेला योग्य दिशा मिळावी, हा या लीगचा मुख्य उद्देश आहे.
‘गल्लीपासून स्टेडियमपर्यंत’ असा खेळाडूंचा प्रवास घडविण्याची संकल्पना या स्पर्धेमागे आहे. राज्यभरातून आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य परिस्थितीतील, विशेषतः शेतकरी कुटुंबांतील सुमारे १,५०० ते १,६०० होतकरू खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. गावागावांतील क्रिकेटपटूंना मोठ्या मैदानावर खेळण्याची संधी मिळावी आणि खेळाच्या माध्यमातून त्यांना स्वावलंबी होता यावे, यासाठी हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.
या स्पर्धेला सामाजिक बांधिलकीची जोडही देण्यात आली आहे. राज्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीचा विचार करून स्पर्धेतून उभारण्यात येणारा निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निधीचा उपयोग शिक्षण आणि आरोग्य सुविधांसाठी केला जाणार असल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.
या लीगमुळे केवळ खेळाडूंनाच नव्हे, तर पंच, प्रशिक्षक आणि क्रीडासाहित्य व्यवसायाशी संबंधित व्यक्तींनाही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. टेनिस क्रिकेटला अधिकृत मान्यता मिळावी आणि या खेळातील गुणवंत खेळाडूंना शासकीय नोकरीच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठीही पाठपुरावा करण्यात येणार आहे.
इंडियन टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनशी संलग्न असलेल्या या स्पर्धेत अनुभवी खेळाडूंचे मार्गदर्शनही नवोदित खेळाडूंना मिळणार आहे. स्पर्धेचे नियम, संघरचना आणि पुढील कार्यक्रमाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.
या पत्रकार परिषदेला भूपेंद्र सिन्हा, ब्रिजेश सोळकर, भरत लोहार, दीपक पवार आणि प्रवीण गंगेरी उपस्थित होते.