महाराष्ट्र फाउंडेशन साहित्य व समाजकार्य पुरस्कार जाहीर
पुणे
अमेरिकेत स्थायिक मराठी बांधवांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र फाउंडेशनच्या वतीने सन २०२५ साठीचे साहित्य व समाजकार्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. साहित्य क्षेत्रातील चार, समाजकार्य क्षेत्रातील तीन आणि डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार असा एकूण आठ पुरस्कारांची घोषणा पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत करण्यात आली.
या पुरस्कारांचे आयोजन महिला सर्वांगीण उत्कर्ष मंडळ (मासूम) आणि साधना ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने केले जाते. याबाबतची माहिती मासूमच्या संयोजक डॉ. मनीषा गुप्ते, डॉ. रमेश अवस्थी, साहित्य पुरस्कार निवड समितीचे समन्वयक मुकुंद टाकसाळे आणि साधना ट्रस्टचे विश्वस्त विनोद शिरसाठ यांनी दिली.
साहित्य पुरस्कारांमध्ये, यावर्षीचा दिलीप वि. चित्रे स्मृती साहित्य जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ समीक्षक व चित्रपट अभ्यासक अरुण खोपकर यांना जाहीर झाला आहे. ग्रंथ पुरस्कार (ललित) निखिलेश चित्रे यांच्या “गॉगल लावलेला घोडा” या कथासंग्रहाला, तर ग्रंथ पुरस्कार (वैचारिक/अपारंपरिक) विनय नारकर यांच्या “वस्त्रगाथा” या ग्रंथाला देण्यात येणार आहे. रा. शं. दातार नाट्यलेखन पुरस्कार ऋत्विक व्यास यांच्या “पाच मजली हॉस्पिटल” या नाट्यसंहितेला जाहीर झाला आहे. साहित्य जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप २ लाख रुपये व स्मृतिचिन्ह, तर इतर साहित्य पुरस्कार प्रत्येकी ५० हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.
समाजकार्य क्षेत्रात, यावर्षीचा समाजकार्य जीवनगौरव पुरस्कार लीलाताई चितळे यांना देण्यात येणार आहे. कार्यकर्ता (संघर्ष) पुरस्कार जावेद पाशा यांना, तर कार्यकर्ता (प्रबोधन) पुरस्कार दत्ता देसाई यांना जाहीर झाला आहे. समाजकार्य जीवनगौरव पुरस्काराचे स्वरूप २ लाख रुपये व स्मृतिचिन्ह, तर कार्यकर्ता पुरस्कार प्रत्येकी ५० हजार रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.
याशिवाय, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार यावर्षी पश्चिम बंगालमधील मनिष राय चौधरी यांना जाहीर झाला असून या पुरस्काराचे स्वरूप १ लाख रुपये व स्मृतिचिन्ह असे आहे.
हे सर्व पुरस्कार शनिवार, १७ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता पुण्यातील एस. एम. जोशी सोशलिस्ट फाउंडेशनच्या सभागृहात होणाऱ्या समारंभात प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गणेश देवी असतील.
मागील ३२ वर्षांपासून साहित्य पुरस्कार आणि ३० वर्षांपासून समाजकार्य पुरस्कार नियमितपणे दिले जात असून, पुरस्कारांचे प्रवर्तक सुनील देशमुख यांच्या तीन वर्षांपूर्वी निधनानंतर या पुरस्कारांना “सुनील देशमुख महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार” असे नाव देण्यात आले आहे. पुरस्कारांच्या निवडीसाठी भारत व अमेरिका येथे स्वतंत्र निवड समित्या कार्यरत असल्याची माहिती मासूमच्या सहसमन्वयक डॉ. मनीषा गुप्ते यांनी दिली


