महावितरण रत्नागिरी मंडलच्या अधीक्षक अभियंता पदी सुधाकर जाधव रुजू

0
11
महावितरण रत्नागिरी मंडलच्या अधीक्षक अभियंता पदी सुधाकर जाधव रुजू
महावितरण रत्नागिरी मंडलच्या अधीक्षक अभियंता पदी सुधाकर जाधव रुजू

महावितरण रत्नागिरी मंडलच्या अधीक्षक अभियंता पदी सुधाकर जाधव रुजू

रत्नागिरी :  महावितरणच्या रत्नागिरी मंडल कार्यालयात अधीक्षक अभियंता पदी सुधाकर जाधव यांनी  (दि. 01 जून) रोजी पदभार स्वीकारला. यापूर्वी कार्यरत अधीक्षक अभियंता सुनिलकुमार माने सेवानिवृत्त झाल्याने रिक्त झालेल्या पदावर सुधाकर जाधव यांची पदोन्नतीद्वारे या पदावर नियुक्ती झाली आहे. यावेळी सुधाकर जाधव यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील मुलभूत वीज यंत्रणा अधिक सक्षम करत वीज ग्राहकांना अधिक दर्जेदार सेवा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असा मानस व्यक्त केला आहे.
सुधाकर जाधव हे सन 1997  मध्ये तत्कालीन एमएसईबी मध्ये सहाय्यक अभियंता म्हणून रुजू झाले. त्यानंतर पदोन्नतीने त्यांनी उपकार्यकारी अभियंता, अतिरिक्त कार्यकारी अभियंता व कार्यकारी अभियंता अशा विविध पदांवर रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, अहिल्यानगर, लातूर  येथे आपली सेवा बजावली आहे. त्यांना वीज क्षेत्राचा प्रदीर्घ असा एकोणतीस वर्षाचा अनुभव आहे. कोल्हापूर मंडळामध्ये ग्राहक तक्रार निवारण मंच येथे कार्यकारी अभियंता पदावर असताना, ग्राहकहित, पारदर्शकता व न्याय तक्रार निवारण या मंचाच्या मूलभूत उद्दिष्टांना अनुसरून त्यांनी अत्यंत प्रभावी व प्रशंसनीय कार्य केले. मंचाकडे दाखल झालेल्या ग्राहकांच्या तक्रारींचे वेळेवर, निष्पक्ष व नियमानुसार परीक्षण केले. ग्राहकांच्या समस्या समजून घेऊन त्यांचे जलद निवारण करण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. वीजपुरवठा, वीजबिल, नवीन जोडणी, मीटर संदर्भातील व इतर विविध तांत्रिक व प्रशासकीय तक्रारींच्या सुनावणीत त्यांनी ग्राहक व महावितरण यांच्यात समन्वय साधून न्याय निर्णय देण्यास हातभार लावला.
त्यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक तक्रार निवारण मंचाच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व व कार्यक्षमता वाढीस लागली. ग्राहकांना त्यांच्या तक्रारींबाबत योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांना न्याय मिळावा व महावितरणबद्दल विश्वास निर्माण व्हावा यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. तक्रारींच्या मूळ कारणांचा अभ्यास करून भविष्यात अशा तक्रारी कमी व्हाव्यात यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना व मार्गदर्शन देण्यातही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. ग्राहकाभिमुख दृष्टिकोन, प्रशासकीय कौशल्य, तांत्रिक ज्ञान व कर्तव्यनिष्ठ कार्यपद्धती यामुळे सुधाकर जाधव यांनी ग्राहक तक्रार निवारण मंच, कोल्हापूरच्या कार्यक्षमतेत मोलाची भर घातली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here