महिला व बाल विकास विभागातील आरोपांची चौकशी करा; मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

0
24
महिला व बाल विकास विभागातील आरोपांची चौकशी करा; मुख्यमंत्र्यांकडे निवेदन
महिला व बाल विकास विभागातील आरोपांची चौकशी करा; मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

महिला व बाल विकास विभागातील आरोपांची चौकशी करा; मुख्यमंत्र्यांकडे निवेदन

पुणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य महिला व बाल विकास विभाग राजपत्रित अधिकारी संघटनेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत महिला व बाल विकास मंत्र्यांचे खासगी सचिव श्री. राजेश गायकवाड यांच्याविरोधात करण्यात आलेल्या गंभीर आरोपांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे.
संघटनेचे अध्यक्ष संतोष भोसले यांच्या स्वाक्षरीने पाठविण्यात आलेल्या निवेदनात, संबंधित अधिकाऱ्यांच्या वर्तणुकीमुळे विभागातील काही अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच महिला अधिकाऱ्यांशी कथित अपमानास्पद वर्तन, प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप, पदाचा गैरवापर, दबावतंत्राचा वापर आणि अधिकाऱ्यांना धमकावल्याचे आरोप निवेदनात करण्यात आले आहेत.
निवेदनानुसार, काही अधिकाऱ्यांच्या तक्रारी मंत्रालय स्तरावर प्राप्त झाल्याचा दावा संघटनेने केला असून, या प्रकरणात निष्पक्ष व सखोल चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणण्याची मागणी करण्यात आली आहे.
संघटनेने निवेदनात म्हटले आहे की, संबंधित प्रकरण संवेदनशील स्वरूपाचे असल्याने उपलब्ध कागदोपत्री व इलेक्ट्रॉनिक पुरावे चौकशी समितीसमोर सादर करण्यात येतील. तसेच चौकशी प्रक्रिया निष्पक्ष राहण्यासाठी संबंधितांना पदावरून दूर करण्याचाही विचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
महिला व बाल विकास विभागातील प्रशासकीय वातावरण सुधारण्यासाठी तसेच अधिकारी व कर्मचाऱ्यांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी शासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, असेही संघटनेने निवेदनात नमूद केले आहे.
दरम्यान, या आरोपांबाबत श्री. राजेश गायकवाड यांची भूमिका अद्याप समोर आलेली नाही. संबंधित आरोपांची स्वतंत्रपणे पुष्टी झालेली नसून, चौकशीअंतीच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here