राजनाथ सिंह यांच्या हस्ते शिर्डीत आर्टिलरी बॉम्ब शेल प्रकल्पाचे उद्घाटन
शिर्डी : शिर्डी औद्योगिक क्षेत्रातील ‘ग्लोब फोर्ज लिमिटेड’ – निबे ग्रुपच्या अत्याधुनिक क्षेपणास्त्र संकुल आणि तोफगोळा उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते आज दिमाखदार सोहळ्यात करण्यात आले. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (CDS) जनरल अनिल चौहान तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

हा प्रकल्प देशातील पहिला आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा आर्टिलरी बॉम्ब शेल निर्मिती प्रकल्प असल्याचा दावा करण्यात आला. या प्रकल्पामुळे भारताच्या संरक्षण उत्पादन क्षमतेत मोठी वाढ होणार असून संरक्षण क्षेत्रातील आत्मनिर्भरतेला बळ मिळणार आहे.
‘मेक इन इंडिया’ आणि ‘मेक इन महाराष्ट्र’ या संकल्पनांना चालना देणारा हा प्रकल्प देशाच्या संरक्षण सज्जतेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानावर आधारित या उत्पादन केंद्रामुळे संरक्षण साहित्य निर्मितीत भारताची क्षमता वाढण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पामुळे स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली. तसेच महाराष्ट्राला देशातील प्रमुख ‘डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हब’ म्हणून विकसित करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
कार्यक्रमास निबे लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक गणेश निबे, निबे ग्रुपचे वरिष्ठ पदाधिकारी, उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


