माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करण्यास प्रतिबंध
माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी करण्यास प्रतिबंध
राज्य सरकार लवकरच जारी करणार परिपत्रक
मुंबई — माथाडी कामगारांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने राज्यात ५० किलोपेक्षा अधिक वजनाच्या मालाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत लवकरच स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार असल्याची माहिती कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी दिली.
यासंदर्भातील नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आयोजित बैठकीत मंत्री फुंडकर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक निर्देश दिले. माथाडी कामगारांकडून ५० किलोपेक्षा जास्त वजनाच्या मालाची हाताळणी करून घेण्यास प्रतिबंध करण्याबाबत केंद्रीय श्रम मंत्रालयाने ३० ऑगस्ट १९९९ रोजी जारी केलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा आढावा यावेळी घेण्यात आला.
बैठकीत माथाडी कामगार संघटना आणि व्यापारी संघटनांमध्ये या विषयावर कोणतेही मतभेद नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. कामगारांचे आरोग्य, शारीरिक सुरक्षितता आणि दीर्घकालीन हित लक्षात घेता ५० किलोपेक्षा अधिक वजनाची हाताळणी टाळणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
राज्यात माथाडी कामगारांकडून जास्तीत जास्त ५० किलो वजनाच्या मालाचीच हाताळणी केली जाईल, यासाठी स्वतंत्र परिपत्रक जारी करण्यात येणार असून त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे मंत्री फुंडकर यांनी सांगितले.
तसेच महाराष्ट्राप्रमाणेच इतर राज्यांमध्येही केंद्र सरकारच्या निर्देशांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी केंद्र सरकारशी समन्वय साधण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
कामगारांच्या आरोग्याचे संरक्षण, कामाच्या ठिकाणी अपघातांचे प्रमाण कमी करणे आणि सुरक्षित कार्यपरिसर निर्माण करणे या उद्देशाने हा निर्णय महत्त्वपूर्ण मानला जात आहे.