परळ येथील हाफकिन संस्थेच्या मुख्यालयात झालेल्या या बैठकीत वैज्ञानिक संशोधन, पारंपरिक औषधांचे वैज्ञानिक प्रमाणीकरण, औषधनिर्मिती क्षेत्रातील नवसंशोधन तसेच सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील सहकार्याच्या विविध संधींवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
हाफकिन संस्थेच्या संचालक डॉ. सुवर्णा खरात यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत संस्थेचे अजित जगताप आणि मृणाल घाग-सावंत यांनी सहभाग घेतला. यावेळी घाना येथील उच्चस्तरीय शिष्टमंडळानेही उपस्थिती लावली.
घानाच्या शिष्टमंडळामध्ये सेंटर फॉर प्लांट मेडिसिन रिसर्च (सीपीएमआर) चे अध्यक्ष हेन्री रॉकफेलर निम्बाबोउरा, कार्यकारी संचालक प्रा. अॅलेक्स असासे, उपकार्यकारी संचालक डॉ. जोनास कोफी डॉनकोर, फॉर्माकॉलॉजी व टॉक्सिकॉलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. स्टीफन अँटवी, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हॅक्सिनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. फैसल नहू तसेच तांत्रिक सल्लागार डेव्हिड बोआमा अचेम्पॉंग यांचा समावेश होता.
बैठकीदरम्यान सर्पदंशावरील उपचार पद्धती अधिक प्रभावी करण्यासाठी संशोधन, वनौषधींच्या औषधी गुणधर्मांचा अभ्यास, आधुनिक विज्ञानाच्या माध्यमातून पारंपरिक उपचारांचे प्रमाणीकरण आणि जागतिक आरोग्य क्षेत्रात संयुक्त संशोधन प्रकल्प राबविण्याच्या शक्यतांवर विचारविनिमय करण्यात आला.
या सहकार्यामुळे भारत आणि घाना या दोन्ही देशांमधील वैज्ञानिक देवाणघेवाण वाढण्याबरोबरच सार्वजनिक आरोग्य, जैववैद्यकीय संशोधन आणि सर्पदंश प्रतिबंधक उपाययोजनांच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण प्रगती होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.