मिरजोळेतील ठाकरे गटाच्या नेत्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश !
रत्नागिरी | प्रतिनिधी
मिरजोळे जिल्हा परिषद गटातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विभागप्रमुख वैभव पाटील, उपविभाग प्रमुख डॉ. मयुरेश पाटील तसेच विभाग संघटक शुभानंद पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री नामदार उदय सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला. हा प्रवेश सोहळा मिरजोळे ग्रामपंचायतीच्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात उत्साहात पार पडला.
गेल्या काही काळापासून मिरजोळे गावातील ठाकरे गटाचे लढवय्ये नेते शिंदे गटात प्रवेश करणार, अशी जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती. मागील दोन वर्षांपासून या चर्चेला उधाण आले होते. काही दिवसांपूर्वी शिवसेना पक्षाच्या वतीने संबंधित नेत्यांशी संपर्क साधण्यात आला. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी रात्री हा प्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला.
या वेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मिरजोळे गावातील ग्रामस्थांनीही मोठ्या संख्येने उपस्थित राहून या राजकीय घडामोडीकडे लक्ष वेधले. कार्यक्रमास शिवसेना तालुका प्रमुख बाबू म्हाप यांचीही उपस्थिती होती.
या प्रवेशामुळे मिरजोळे परिसरातील शिवसेनेच्या संघटनात्मक बळात वाढ होणार असल्याचे मत यावेळी उपस्थित नेत्यांनी व्यक्त केले.


