सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ‘छोट्या उद्योजकांची मोठी खाद्यजत्रा’ उत्साहात संपन्न

0
82
सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ‘छोट्या उद्योजकांची खाद्यजत्रा’ उत्साहात संपन्न
सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ‘छोट्या उद्योजकांची खाद्यजत्रा’ उत्साहात संपन्न

सेंट्रल इंग्लिश स्कूलमध्ये ‘छोट्या उद्योजकांची मोठी खाद्यजत्रा’ उत्साहात संपन्न

सावंतवाडी | प्रतिनिधी

सेंट्रल इंग्लिश स्कूल, सावंतवाडी येथे “छोट्या उद्योजकांची मोठी खाद्यजत्रा” हा नाविन्यपूर्ण उपक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदी वातावरणात पार पडला. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकतेची बीजे रोवणे तसेच व्यवहारज्ञान वाढवणे या उद्देशाने प्रशालेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमाचे उद्घाटन पालक-शिक्षक कार्यकारिणी समितीच्या उपाध्यक्षा श्रीम. शाहिना बक्कर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालक-शिक्षक कार्यकारिणी समितीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते. प्रशालेतील केजी विभागासह इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवित विविध चविष्ट पदार्थांचे स्टॉल्स उभारले.

विद्यार्थ्यांनी पालकांच्या मार्गदर्शनाखाली भाज्या व फळांचा वापर करून सँडविच, चीज सँडविच, फळांचे ज्यूस, केक, ब्रेड पिझ्झा, चिकन मलाई, चिकन रोल, फ्रूट कस्टर्ड, डोनट्स, नूडल्स, बर्गर, वेफर चाट, भेळ, विठ्ठल वडा, पाणीपुरी, शेवपुरी, मिल्कशेक, कोल्ड कॉफी, लिंबू सरबत, पावभाजी, ओरिओ डेझर्ट, चिकन बिर्याणी, गाजर हलवा, मोमोज, कॉर्न चाट, चिकन स्टिक्स आदी विविध पदार्थ तयार करून विक्रीस ठेवले होते. प्रत्येक स्टॉल आकर्षक सजावटीने सजवण्यात आला असून पदार्थांचे सादरीकरणही अत्यंत सुंदर आणि शिस्तबद्ध पद्धतीने करण्यात आले होते.

या खाद्यजत्रेमुळे विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष व्यवहारातून खरेदी-विक्रीचे ज्ञान मिळाले. त्याचबरोबर विविध खाद्यसंस्कृतींची ओळख, सहकार्याचे महत्त्व, स्वच्छतेचे नियम, संघभावना आणि नियोजन कौशल्य यांचेही धडे मिळाले. उद्योगविश्वाची प्राथमिक ओळख विद्यार्थ्यांना या उपक्रमातून झाली.

पालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पाककला कौशल्याला वाव देण्यासाठी प्रशालेने उपलब्ध करून दिलेल्या या व्यासपीठाचे पालकवर्गातून विशेष कौतुक होत आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणारा आणि शिक्षणासोबतच जीवनोपयोगी कौशल्ये विकसित करणारा हा उपक्रम असल्याचे मत अनेक पालकांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमास सावंतवाडी मर्कझी जमात व बॉम्बे संस्थेचे पदाधिकारी, प्रशालेच्या मुख्याध्यापिका श्रीम. निर्मला हेशागोळ, सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, पालक-शिक्षक कार्यकारिणी समितीचे सदस्य, पालकवर्ग आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी या चविष्ट पदार्थांचा मनमुराद आस्वाद घेत विद्यार्थ्यांचे आणि प्रशालेचे भरभरून कौतुक केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here