मिरा-भाईंदर महापालिकेचा तिसरा ‘महापौर दिन’ संपन्न; नागरिकांच्या १२ तक्रारींवर तत्काळ कारवाईचे निर्देश
मिरा-भाईंदर महापालिकेचा तिसरा ‘महापौर दिन’ संपन्न; नागरिकांच्या १२ तक्रारींवर तत्काळ कारवाईचे निर्देश
मिरा-भाईंदर | प्रतिनिधी
मिरा-भाईंदर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील नागरिकांच्या नागरी समस्या, तक्रारी आणि सूचनांचे प्रभावी व पारदर्शक निराकरण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात येणारा ‘महापौर दिन’ उपक्रमांतर्गत सोमवारी तिसरा ‘महापौर दिन’ यशस्वीपणे पार पडला.
या उपक्रमादरम्यान नागरिकांनी आपल्या परिसरातील विविध समस्या, तक्रारी आणि सूचना थेट महापौर श्रीमती डिंपल विनोद मेहता यांच्यासमोर मांडल्या. तिसऱ्या ‘महापौर दिना’मध्ये एकूण १२ तक्रारी प्राप्त झाल्या.
महापौरांनी प्राप्त तक्रारींची सविस्तर माहिती जाणून घेत संबंधित अधिकारी आणि विभागप्रमुखांना समस्यांच्या गांभीर्यानुसार तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तसेच तक्रारींचे केवळ नोंदणीपुरते मर्यादित न राहता वेळेत आणि प्रभावीपणे निराकरण होण्यासाठी पाठपुरावा करण्याच्या सूचनाही दिल्या.
नागरिकांना प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी उपलब्ध करून देणारा हा उपक्रम सकारात्मक प्रतिसाद मिळवत असून नागरी समस्यांच्या निराकरणासाठी महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरत आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. संभाजी पानपट्टे, उपायुक्त स्वप्नील सावंत, माहिती व जनसंपर्क अधिकारी राज घरत, सर्व प्रभागनिहाय सहाय्यक आयुक्त तसेच विविध विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.