“मुंबईच्या क्रीडा परंपरेचा नवा अध्याय सुरू करूया” – महापौर रितू तावडे

0
51
“मुंबईच्या क्रीडा परंपरेचा नवा अध्याय सुरू करूया” – महापौर रितू तावडे
“मुंबईच्या क्रीडा परंपरेचा नवा अध्याय सुरू करूया” – महापौर रितू तावडे

“मुंबईच्या क्रीडा परंपरेचा नवा अध्याय सुरू करूया” – महापौर रितू तावडे

मुंबई : ‘महापौर चषक क्रीडा स्पर्धा २०२५-२६’ च्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आयोजित संयुक्त बैठकीत महापौर रितू तावडे यांनी मुंबईच्या क्रीडा परंपरेला नवसंजीवनी देण्याचा निर्धार व्यक्त केला. कोविडनंतर प्रथमच ही स्पर्धा भव्य स्वरूपात आयोजित होत असल्याचा आनंद व्यक्त करत त्यांनी मुलांना पुन्हा मैदानाकडे वळवणे हेच मुख्य उद्दिष्ट असल्याचे सांगितले.

महापौर तावडे म्हणाल्या की, आजच्या डिजिटल युगात वाढलेला ‘स्क्रीन टाइम’ कमी करून मुलांमध्ये क्रीडाप्रेम निर्माण करणे अत्यंत गरजेचे आहे. स्वतः राज्यस्तरीय खो-खो खेळाडू असल्याने खेळाडूंच्या अडचणींची जाणीव असल्याचे त्यांनी नमूद केले.

या बैठकीत स्पर्धेसंदर्भात अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. २०२६-२७ साठी ५ कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच सहभागी संघांना पालिकेची मैदाने कमी शुल्कात उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात येणार आहे. क्रीडा संघटनांच्या मागणीनुसार स्पर्धेच्या तयारीसाठी कालावधी ३ महिन्यांवरून ४ महिने करण्यात येणार आहे.

पारंपरिक खेळांना चालना देण्यावरही भर देण्यात आला असून या स्पर्धेच्या माध्यमातून स्थानिक खेळाडूंना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. स्पर्धा अधिक व्यापक करण्यासाठी स्थानिक नगरसेवकांचा सहभागही वाढविण्यात येणार आहे.

या बैठकीस उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासराव, समाजवादी पक्षाच्या गटनेत्या अमरीन शहजाद अब्राहनी, महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी, तसेच विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील क्रीडा संस्कृती जोपासून खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यास महानगरपालिका कटिबद्ध असल्याचे महापौर तावडे यांनी यावेळी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here