मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वितरण सुरू
मुंबईतील नोंदणीकृत फेरीवाल्यांना क्यूआर कोड आधारित ओळखपत्रांचे वितरण सुरू
मुंबई
मुंबईतील नोंदणीकृत नगरपथविक्रेत्यांना (फेरीवाले) अधिकृत ओळख प्रदान करण्याच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत क्यूआर कोड आधारित ओळखपत्र वितरण उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयातील स्थायी समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या हस्ते या उपक्रमाचे उद्घाटन झाले.
या कार्यक्रमाला सभागृह नेते गणेश खणकर, स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे, शिवसेना गटनेते अमेय घोले, काँग्रेस गटनेते अशरफ आझमी, मनसे गटनेते यशवंत किल्लेदार यांच्यासह विविध समित्यांचे अध्यक्ष, नगरसेवक आणि अधिकारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर रितू तावडे यांनी सांगितले की, या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे मुंबईतील फेरीवाल्यांना त्यांची अधिकृत व हक्काची ओळख मिळणार आहे. क्यूआर कोड तंत्रज्ञानाचा वापर केल्यामुळे ओळखपत्रांची पडताळणी सुलभ होणार असून प्रशासनातील पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल.
मुंबईच्या अर्थव्यवस्थेत फेरीवाल्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांना डिजिटल व्यवस्थेशी जोडण्याच्या दृष्टीने महापालिका कटिबद्ध असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमामुळे नोंदणीकृत फेरीवाल्यांच्या माहितीचे व्यवस्थापन अधिक सुलभ होणार असून त्यांना विविध प्रशासकीय सुविधांचा लाभ घेणेही सोपे होणार आहे.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व लाभार्थी फेरीवाल्यांचे अभिनंदन करण्यात आले आणि या उपक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले.