मुंबईत तब्बल ८७,३४७ अवैध जन्म प्रमाणपत्रांचा संशय; एसआयटी चौकशीचे आदेश
Mumbai : मुंबई महापालिकेच्या जन्मनोंदणी व्यवस्थेमध्ये मोठा गैरप्रकार उघडकीस आल्याचा धक्कादायक दावा समोर आला आहे. २०२४ ते २०२६ या कालावधीत तब्बल ८७,३४७ जन्म प्रमाणपत्रे कथितरीत्या कालबाह्य SAP प्रणालीद्वारे जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली असून याप्रकरणी शहरव्यापी ऑडिट आणि विशेष तपास पथक (SIT) चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
केंद्रीय सरकारच्या अनिवार्य CRS (Civil Registration System) पोर्टलला बगल देत जुन्या SAP प्रणालीचा वापर करून ही प्रमाणपत्रे जारी करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणात काही अवैध स्थलांतरितांनाही लाभ मिळाल्याची शक्यता तपासात व्यक्त करण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासासाठी SIT स्थापन केली असून अधिकाऱ्यांची भूमिका, रेकॉर्डमध्ये फेरफार आणि बनावट कागदपत्रांच्या साखळीचा तपास सुरू आहे. काही अधिकाऱ्यांवर निलंबन आणि प्रशासकीय कारवाईही करण्यात आली आहे.
या प्रकरणामुळे ओळखपत्र सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून आधार, बँक KYC आणि इतर सरकारी योजनांमध्ये अशा प्रमाणपत्रांचा वापर झाला का, याचाही तपास केला जात आहे.


