मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मानाच्या वारकरी दाम्पत्याचा सत्कार
‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार २०२६’ प्रदान
पंढरपूर, दि. २५ :
देवशयनी आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सहकुटुंब पंढरपूर येथे भगवान श्री विठ्ठल व श्री रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा केली. यावेळी महाराष्ट्रात सुख, समृद्धी, शेतकऱ्यांचे कल्याण आणि जनतेच्या आनंदी जीवनासाठी त्यांनी विठूमाऊलीच्या चरणी प्रार्थना केली.
महापूजेनंतर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते मानाचे वारकरी दाम्पत्य श्री. बाळासाहेब माने आणि श्रीमती प्रभावती माने यांचा सत्कार करण्यात आला. तसेच, त्यांच्या हस्ते ‘श्री विठ्ठल निर्मल दिंडी पुरस्कार २०२६’ प्रदान करण्यात आला.
यावेळी मंत्री गिरीष महाजन, जयकुमार गोरे, आकाश फुंडकर, आमदार समाधान आवताडे, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे सह-अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, यंदाची आषाढी वारी नव्या उच्चांकावर पोहोचली असून २५ किलोमीटरहून अधिक अंतरापर्यंत भाविकांच्या रांगा लागल्या आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने भाविक उपस्थित असूनही त्यांच्या दर्शन आणि निवासाची व्यवस्था अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने करण्यात आली आहे.
ते पुढे म्हणाले की, जगात असा आनंदाचा आणि भक्तीचा सोहळा दुसरा नाही, जिथे कोणत्याही निमंत्रणाशिवाय लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरला येतात. ही महाराष्ट्राच्या संतपरंपरेची आणि भक्तीची अद्वितीय परंपरा आहे.
भाविकांची वाढती संख्या लक्षात घेता यावर्षी पंढरपूर मंदिर कॉरिडॉरच्या कामाला प्रारंभ करण्यात येणार असून, हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर दर्शन व्यवस्था अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुव्यवस्थित होईल, अशी माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
यावेळी त्यांनी वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलसेवा असल्याचे सांगत, राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि मोफत वीज देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतल्याचाही उल्लेख केला.