प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकारी नियुक्त करणार
प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकारी नियुक्त करणार
जिल्हाधिकारी कार्यालयात स्वतंत्र मराठी भाषा कार्यालय सुरू होणार – मंत्री उदय सामंत
छत्रपती संभाजीनगर, दि. २५ :
छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषा विभागाच्या कामाचा आढावा घेण्यासाठी तसेच जिल्ह्यातील साहित्यिकांशी संवाद साधण्यासाठी आयोजित विशेष बैठकीत मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी सहभाग घेतला. यावेळी त्यांनी साहित्यिकांशी सविस्तर संवाद साधत मराठी भाषा, साहित्य आणि बोलीभाषांच्या संवर्धनासाठी राज्य सरकारच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
बैठकीत बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, मराठी भाषेचे विविध सांस्कृतिक पैलू समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत पोहोचविण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात मराठी भाषा अधिकारी नियुक्त करण्यात येणार असून, जिल्हाधिकारी कार्यालयात मराठी भाषेचे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात येईल.
याशिवाय, मराठी भाषा, विविध बोलीभाषा, साहित्य आणि संशोधनाला चालना देण्यासाठी व्यापक पातळीवर प्रयत्न केले जातील. मराठी साहित्याचा प्रसार, संवर्धन आणि नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध असून, स्थानिक साहित्यिक व अभ्यासकांनी मांडलेल्या अडचणी व सूचनांवर सकारात्मक आणि तातडीने कार्यवाही केली जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
या बैठकीला आमदार विलास बापू भुमरे, जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी., मराठी भाषा विभागाचे अधिकारी तसेच जिल्ह्यातील प्रमुख साहित्यिक आणि अभ्यासक उपस्थित होते.