मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ सेवेचा शुभारंभ; चालक-केंद्रित सहकारी मॉडेलला चालना

0
15
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ सेवेचा शुभारंभ; चालक-केंद्रित सहकारी मॉडेलला चालना
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ सेवेचा शुभारंभ; चालक-केंद्रित सहकारी मॉडेलला चालना

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ सेवेचा शुभारंभ; चालक-केंद्रित सहकारी मॉडेलला चालना

नवी मुंबई
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे ‘भारत टॅक्सी’ सेवेचा हिरवा झेंडा दाखवून शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार मंदा म्हात्रे, महेश बालदी, प्रशांत ठाकूर तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी “सहकारातून रोजगार, रोजगारातून समृद्धी” या संकल्पनेला भारत टॅक्सीच्या माध्यमातून नवी दिशा मिळणार असल्याचे सांगितले. दिल्ली आणि गुजरातनंतर आता महाराष्ट्रातही या सेवेची सुरुवात होत असून, चालकांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी हा महत्त्वाचा टप्पा ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले.
मुख्यमंत्री म्हणाले, भारत टॅक्सी हे केवळ टॅक्सी बुकिंग ॲप नसून चालक-केंद्रित सहकारी मॉडेल आहे. या उपक्रमात चालक हे केवळ वाहनचालक नसून स्वतः मालक आणि सहकारी संस्थेचे भागधारक आहेत. त्यामुळे व्यवसायातून होणाऱ्या नफ्यात त्यांचाही थेट सहभाग राहणार असून सहकार क्षेत्रालाही नवी ऊर्जा मिळेल.
सध्याच्या अनेक ॲप-आधारित टॅक्सी सेवांमध्ये सर्ज प्रायसिंग आणि हिडन चार्जेस बाबत तक्रारी येतात. मात्र भारत टॅक्सीमध्ये सर्ज प्रायसिंग नसून कोणतेही लपविलेले शुल्क आकारले जाणार नाही. पारदर्शक दररचनेमुळे प्रवाशांना विश्वासार्ह, सुरक्षित आणि परवडणारी सेवा मिळेल, तर चालकांनाही त्यांच्या श्रमाचा योग्य मोबदला मिळेल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मुंबईची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक आधुनिक, सक्षम आणि तंत्रज्ञानाधारित करण्याच्या दृष्टीने भारत टॅक्सी हा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्व. दि. बा. पाटील सहकारी वाहतूक संघासोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ परिसरातील भूमिपुत्रांना बँकांच्या माध्यमातून टॅक्सी खरेदीसाठी कर्ज उपलब्ध होणार असून ३ ते ४ हजार रोजगार निर्माण होण्यास मदत होईल, अशी माहिती त्यांनी दिली.
महिलांसाठी अधिक सुरक्षित प्रवास, ग्राहकांना त्रासमुक्त सेवा आणि मुंबईत येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला विश्वास, सुरक्षितता व पारदर्शकतेचा अनुभव देणारी सेवा म्हणून भारत टॅक्सीची ओळख निर्माण होईल, असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी हा उपक्रम मुंबईच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक सक्षम बनविणारा महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल, असे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here