'राज्य महोत्सव' म्हणून गणेशोत्सव भव्य स्वरूपात साजरा करा
‘राज्य महोत्सव’ म्हणून गणेशोत्सव भव्य स्वरूपात साजरा करा
कृती आराखडा व जीआर तातडीने तयार करण्याचे निर्देश – मंत्री आशिष शेलार
मुंबई
राज्य शासनाने गणेशोत्सवाला ‘राज्य महोत्सव’ म्हणून घोषित केल्यानंतर यंदाचा उत्सव अधिक व्यापक, सुबद्ध आणि लोकसहभागातून साजरा करण्यासाठी सर्व शासकीय विभागांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करावा. विभागनिहाय जबाबदाऱ्या निश्चित करून कृती आराखडा तयार करावा तसेच यासंदर्भातील शासन निर्णय (जीआर) तातडीने तयार करावा, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. आशिष शेलार यांनी दिले.
मंत्रालयात गणेशोत्सवाच्या नियोजनासंदर्भात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाची एकसमान ओळख निर्माण करण्यासाठी अधिकृत लोगो, गीत, माहिती, शिक्षण आणि जनजागृती साहित्य सर्व विभागांना उपलब्ध करून देण्यात यावे तसेच राज्यभरातील सर्व कार्यक्रमांमध्ये त्याचा एकसमान वापर करण्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीत राज्यातील कला, संस्कृती आणि लोकपरंपरांना चालना देण्यासाठी विविध उपक्रमांवरही विचारविनिमय करण्यात आला. शाडूच्या मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांना प्रोत्साहन देणे, महाविद्यालयीन युवकांचा सहभाग वाढविणे, शालेय विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक उपक्रम आयोजित करणे, हस्तकला प्रदर्शन भरविणे, सामाजिक जनजागृती कार्यक्रम राबविणे तसेच पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्रोत्साहन देण्यासाठी विशेष उपक्रम हाती घेण्यावर भर देण्यात आला.
यंदाचा गणेशोत्सव राज्याच्या सांस्कृतिक वैभवाचे दर्शन घडविणारा आणि सर्वसमावेशक लोकउत्सव ठरेल, या दृष्टीने सर्व विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले.