मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्ह्याची बाजी; आडाचिवाडी ग्रामपंचायत राज्यात प्रथम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्ह्याची बाजी – आडाचिवाडी ग्रामपंचायत राज्यात प्रथम
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात पुणे जिल्ह्याची दमदार कामगिरी; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन
पुणे :
मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाच्या पहिल्याच वर्षात पुणे जिल्ह्याने राज्यस्तरावर उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुरंदर तालुक्यातील आडाचिवाडी ग्रामपंचायतीने राज्यात प्रथम क्रमांक पटकावला असून, पुणे जिल्हा परिषदेने राज्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे. पुणे जिल्ह्याची पालकमंत्री म्हणून ही कामगिरी अभिमानास्पद असल्याची भावना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केली.
या अभियानांतर्गत जिल्ह्यात २४५ कोटी रुपयांची थकीत करवसुली करण्यात आली असून, ७.९७ कोटी रुपयांची लोकवर्गणी जमा झाली आहे. तसेच ११ हजारांहून अधिक नवीन बचत गटांची निर्मिती, ७३४ जलस्रोतांचे बळकटीकरण, ५ हजार २४४ सौर कृषिपंपांची उभारणी आणि ७ लाखांहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.
महिला सक्षमीकरण, सामाजिक सुरक्षा, शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पर्यावरण संवर्धन अशा विविध क्षेत्रांतही अभियानाच्या माध्यमातून भरीव काम करण्यात आले आहे. ग्रामीण विकासासाठी लोकसहभागाला प्राधान्य देत विविध उपक्रम राबविण्यात आल्याने जिल्ह्याला हे यश मिळाले आहे.
जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्यासह अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकजुटीने केलेल्या प्रयत्नांचे हे फलित असल्याचे सुनेत्रा पवार यांनी नमूद केले.
आडाचिवाडी ग्रामपंचायतीसह अभियानात सहभागी झालेल्या जिल्ह्यातील सर्व २७६ ग्रामपंचायती, पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि ग्रामस्थांचे त्यांनी अभिनंदन केले. लोकसहभाग, प्रभावी नियोजन आणि परिणामकारक अंमलबजावणीच्या माध्यमातून समृद्ध, सक्षम आणि आत्मनिर्भर गावांच्या निर्मितीसाठी पुणे जिल्ह्याने घालून दिलेला आदर्श प्रेरणादायी असल्याचेही त्यांनी सांगितले.