म्हसळा तालुक्यात १०९ शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती व पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन; कृषी विज्ञान केंद्र रोहाचा उपक्रम

0
12
म्हसळा तालुक्यात १०९ शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती व पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन; कृषी विज्ञान केंद्र रोहाचा उपक्रम
म्हसळा तालुक्यात १०९ शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती व पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन; कृषी विज्ञान केंद्र रोहाचा उपक्रम

म्हसळा तालुक्यात १०९ शेतकऱ्यांना नैसर्गिक शेती व पीक व्यवस्थापनाचे मार्गदर्शन; कृषी विज्ञान केंद्र रोहाचा उपक्रम

म्हसळा :
बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे योग्य व्यवस्थापन, पाणी बचत, सेंद्रिय खतांचा वापर आणि रब्बी हंगामातील पीक नियोजन याबाबत शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन करण्यासाठी म्हसळा तालुक्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमांचा तालुक्यातील एकूण १०९ शेतकऱ्यांनी लाभ घेतला.

२९ ऑक्टोबर २०२६ रोजी डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली अंतर्गत कार्यरत कृषी विज्ञान केंद्र, रोहा यांच्या तांत्रिक मार्गदर्शनाखाली तालुका कृषी अधिकारी कार्यालय, म्हसळा यांच्या वतीने काळसुरी, खरसई आणि केलटी या गावांमध्ये विविध कार्यक्रम घेण्यात आले. क्रॉपसॅप योजनेंतर्गत नैसर्गिक शेती शाळा, शेतीदिन आणि शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तसेच खेत बचाओ अभियानांतर्गतही शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
यावेळी कृषी विज्ञान केंद्र, रोहा येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. मनोज तलाठी यांनी प्रत्यक्ष प्रक्षेत्र भेटी देऊन शेतकऱ्यांना सखोल तांत्रिक मार्गदर्शन केले. भात पिकाचे योग्य व्यवस्थापन, बदलत्या हवामानानुसार शेती पद्धतीत करावयाचे बदल, पाणी बचतीचे उपाय, शेतीमध्ये सेंद्रिय खतांचे महत्त्व, मातीचे नमुने घेणे व त्यांची तपासणी याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच आगामी रब्बी हंगामाच्या दृष्टीने कडधान्यांची लागवड आणि रब्बी भाजीपाला उत्पादनाचे नियोजन याविषयीही मार्गदर्शन केले.
शेतीतील उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी मातीचे आरोग्य जपणे, उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे आणि हवामानातील बदल लक्षात घेऊन पीक व्यवस्थापन करणे आवश्यक असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. प्रत्यक्ष शेतावर जाऊन दिलेल्या मार्गदर्शनामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तसेच नैसर्गिक शेती पद्धतींची माहिती मिळाली.
या कार्यक्रमांना तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय शिंदे, मंडळ कृषी अधिकारी सुनील गोडगे, उपकृषी अधिकारी संजय कुमार शिंदे यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. म्हसळा तालुक्यातील १०९ शेतकऱ्यांनी या उपक्रमात सहभागी होत मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here