यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२६ची अधिसूचना जाहीर
नवी दिल्ली l प्रतिनिधी
संघ लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) २०२६ साठी अधिकृत अधिसूचना जारी केली असून, यामध्ये पात्रता निकषांसह सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाचे नियमबदल जाहीर करण्यात आले आहेत. या बदलांचा थेट परिणाम IAS, IFS आणि IPSसह विविध ग्रुप ‘अ’ सेवांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांवर होणार आहे.
भारतीय प्रशासकीय सेवा (IAS) साठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडे भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही विषयातील पदवी असणे आवश्यक आहे. तर भारतीय वन सेवा (IFS) साठी पशुसंवर्धन, पशुवैद्यकीय विज्ञान, वनस्पतिशास्त्र, रसायनशास्त्र, भूगर्भशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र किंवा कृषी या विषयांपैकी एखाद्या विषयातील पदवी अनिवार्य करण्यात आली आहे.
यूपीएससीने आधीच सेवेत असलेल्या उमेदवारांसाठी नियम अधिक कडक केले आहेत. ज्या उमेदवारांची आधीच कोणत्याही सेवेत निवड झाली आहे, ते CSE २०२६ साठी अर्ज करू शकणार नाहीत. तसेच, एखाद्या उमेदवाराची पूर्वपरीक्षेनंतर पण मुख्य परीक्षेपूर्वी सेवेत निवड झाली, तर त्यांना मुख्य परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाणार नाही.
IPS संदर्भातही आयोगाने नवा नियम जाहीर केला आहे. मागील परीक्षांच्या आधारे IPS साठी निवड झालेल्या उमेदवारांना २०२६ च्या निकालांच्या आधारे पुन्हा IPS कॅडरसाठी निवड मिळणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
यूपीएससीने २०२५ किंवा त्यापूर्वी CSEद्वारे सेवेत रुजू झालेल्या उमेदवारांना २०२६ किंवा २०२७ मध्ये उर्वरित प्रयत्नांचा वापर करण्यासाठी शेवटची संधी दिली आहे.मात्र, २०२८ किंवा त्यानंतर नागरी सेवा परीक्षेला बसायचे असल्यास उमेदवारांना त्यांच्या सध्याच्या पदाचा राजीनामा देणे बंधनकारक असेल.


