प्रामाणिकपणाला सलाम !
चेन्नई
अभिनेते रजनीकांत यांनी मंगळवारी चेन्नई येथील त्यांच्या निवासस्थानी स्वच्छता कर्मचारी पद्मा यांची भेट घेऊन त्यांच्या प्रामाणिकपणाचा गौरव केला. कामावर असताना रस्त्यावर सापडलेले तब्बल ४५ तोळे सोन्याचे दागिने त्यांनी कोणताही मोह न ठेवता पोलिसांच्या माध्यमातून मूळ मालकापर्यंत पोहोचवले होते.
ही घटना चेन्नईच्या टी नगर परिसरात या महिन्याच्या सुरुवातीला घडली. स्वच्छता काम करत असताना पद्मा यांना सोन्याने भरलेली एक पिशवी सापडली. कोणताही गैरफायदा न घेता त्यांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला आणि कायदेशीर प्रक्रियेद्वारे ती पिशवी सुरक्षितपणे योग्य मालकाकडे सुपूर्द करण्यात आली. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.
पद्मा यांच्या या आदर्शवत प्रामाणिकपणाने प्रभावित होऊन रजनीकांत यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेतली. यावेळी त्यांनी पद्मा यांना सोन्याची साखळी भेट देत सन्मानित केले. हा सन्मान कोणत्याही बक्षीसाच्या स्वरूपात नसून, प्रामाणिकपणा, नीतिमत्ता आणि मूल्यांप्रती आदर व्यक्त करण्यासाठी असल्याचे रजनीकांत यांनी स्पष्ट केले.


